प्रयागराज (कुंभनगरी) : हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणाविषयी लावलेले हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे. या देशात गायींची हत्या थांबलीच पाहिजे. अशा प्रकारे धर्मप्रसाराचे कार्य केल्यास आपला समाज, धर्म आणि राष्ट्र यांना चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन त्रिपुरा राज्यातील आगरतला, टेलियामुरा येथील नागमाता सेवाश्रमाच्या साध्वी जय जगतगौरी मनसा यांनी १ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या कु. कृतिका खत्री यांनी त्यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते. या वेळी बंगाल येथील साध्वी रिद्धी प्राणापुरी म्हणाल्या, ‘‘सनातन संस्थेचे हिंदु धर्मावर मोठ्या प्रमाणात संशोधन आहे. या संशोधनातून हिंदु राष्ट्र स्थापनेला साहाय्य होणार आहे.’’