Menu Close

मृत रुग्णावर उपचार करण्याच्या नावाखाली लक्षावधी रुपयांची लूट करणारे रुग्णालय !

‘उत्तरप्रदेशच्या अलिगडमध्ये रहाणारा रोहित (वय १८ वर्षे) एका खासगी आस्थापनात ‘फिटर’चे काम (जोडारी काम) करत होता. वर्ष २०१८ च्या डिसेंबर मासात एका बुधवारी आस्थापनाचे १२ कर्मचारी कामानिमित्त जात असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात रोहित घायाळ झाला. त्याला उपचारांसाठी कानपूरच्या सर्वोदय नगरमधील एका खासगी रुग्णालयात तात्काळ भरती करण्यात आले. दुसर्‍या दिवशी म्हणजेच गुरुवारी रुग्णालयाने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याच्या कुटुंबियांना ३ लक्ष ३० सहस्त्र रुपये एवढी अनामत रक्कम जमा करण्यास सांगितली. शुक्रवारी रोहितच्या आस्थापनातील कर्मचारी त्याला पहाण्यासाठी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात गेले, तेव्हा तो मृत झाल्याचे तेथील आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) सांगितले. जेव्हा शवविच्छेदन करण्यात आले, तेव्हा रोहितच्या पोटात २ चौरस इंच आकाराचे कापसाचे २८ तुकडे आढळले. गंभीर सूत्र असे की, रुग्णालयाकडून शवविच्छेदनाचा जो अहवाल पोलिसांना दिला गेला, त्यात रोहितचा मृत्यू बुधवारीच झाल्याचे नमूद होते. रुग्णालयाने रोहित मृत झाला असूनही त्याच्या मृत्यूच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच गुरुवारी शस्त्रक्रियेच्या नावाखाली लक्षावधी रुपयांची लूट केली आणि कुटुंबियांच्या भावनांशी खेळ केला.

अशा प्रसंगात फसवणूक करणारे रुग्णालय आणि आधुनिक वैद्य (डॉक्टर) यांच्या विरोधात मृताचे कुटुंबीय पुढील कार्यवाही करू शकतात

१. रुग्णालयाचे व्यवस्थापक/मालक आणि संबंधित कर्मचारी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार प्रविष्ट करावी.

२. आर्थिक हानीभरपाई मिळण्यासाठी ‘जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचा’कडे त्वरित तक्रार करावी.

३. वरील घटनेचा विचार करता मृताच्या कुटुंबियांनी मंचाकडे तक्रार करतांना पुढीलप्रमाणे कागदपत्रे एकत्र करणे आवश्यक आहे – शवविच्छेदनाचा अहवाल, रुग्णालयाच्या सर्व पावत्या, तसेच ३ लक्ष ३० सहस्त्र रुपये जमा केल्याची पावती (तिच्यावर रक्कम जमा केल्याचा दिनांक असणे आवश्यक आहे.) आणि दोन दिवसांचे अतिदक्षता विभागाचे देयक दिले असल्यास त्याची पावती इत्यादी कागदपत्रे स्वत:कडे घ्यावीत अन् निवाड्याच्या वेळी सादर करावीत.

– अश्‍विनी कुलकर्णी, आरोग्य साहाय्य समिती

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’ची मोहीम !

वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव, तसेच आपल्या परिसरात अनुचित घटना घडत असल्यास त्याविषयी आम्हाला त्वरित कळवा.

चांगले आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना नम्र विनंती !

पैसे लुबाडणार्‍या आधुनिक वैद्यांची नावे उघड करण्यासाठी कृपया आम्हाला साहाय्य करा. ही तुमची साधनाच असेल. तुम्हाला तुमचे नाव गोपनीय ठेवण्याची इच्छा असल्यास ते गोपनीय ठेवण्यात येईल.

आपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता

सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा – ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०
इ-मेल पत्ता : [email protected]

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *