१. वैद्यकीय नीतीमूल्यांच्या कट्टर समर्थक असलेल्या श्रीमती फिओना गॉडली यांचा परिचय आणि त्यांचे कार्य !
‘श्रीमती फिओना गॉडली या वैद्यकीय नितीमूल्यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्यांनी अनेक देशांतील वैद्यकीय दुरावस्थेविषयी त्या त्या देशातील शासनाची कानउघडणी केली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी नीतीमत्ताहीन अशा अनेक शासनकर्त्यांना सत्तेतून पायउतारही केले आहे. त्यांनी जगातील ‘औषध उत्पादनांचे सम्राट’ म्हणून ओळखली जाणारी ‘रोशे’ आणि ‘ग्लॅक्सोस्मिथक्लाइन’ ही आस्थापने औषधांच्या चाचणीविषयीची माहिती लपवत असल्याचे उघड करून त्यांच्याविरुद्ध उभे रहाण्याचे धाडस दाखवले आहे. वैज्ञानिक क्षेत्रात चाललेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध त्या निर्भयपणे बोलतात. त्या ‘रुग्ण-केंद्रित आरोग्यसेवे’च्या (पेशंट-सेंट्रिक हेल्थकेअर’च्या) कट्टर समर्थक आहेत. भारतात आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्रिटीश मेडिकल जर्नल दक्षिण आशिया पुरस्कार २०१६’ या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिल्या होत्या.
२. श्रीमती फिओना गॉडली आणि श्री. राजीव सिंह यांच्या चर्चेतील निवडक भाग !
गॉडली यांनी ‘हवेच्या प्रदूषणा’पासून ते ‘औषधांच्या संदर्भात होणारा भ्रष्टाचार’, अशा विविध विषयांवर आणि ‘ब्रिटीश मेडिकल जर्नल’ करत असलेल्या कार्याविषयी श्री. राजीव सिंह यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतील निवडक भाग पुढे देत आहोत.
२ अ. इंधनातील भेसळीमुळे भारतात प्रदूषण वाढत असल्याने शासनाने यावर उपाययोजना करणे आवश्यक ! – श्रीमती फिओना
श्री. राजीव सिंह : भारतातील प्रचंड प्रदूषित हवेत श्वास घेतांना कसे वाटत आहे ?
श्रीमती फिओना : मला भारत देश पुष्कळ आवडतो. हा अतिशय सुंदर देश आहे. मी दोन वर्षांनी येथे आले. काही दिवसांपूर्वी मी भारतातील वातावरणाविषयी जे वाचले आणि पाहिले होते, त्यापेक्षा आता येथील वातावरण पुष्कळ चांगले आहे. लोकांच्या मानसिकतेत सकारात्मक पालट होत आहे. ‘हवेचे प्रदूषण थांबवणे महत्त्वाचे आहे’, हे लोकांना पटले आहे. हवेच्या प्रदूषणाविषयी लोकांमध्ये जागरूकता आणणे महत्त्वाचे आहे. इंधनातील भेसळीमुळे वातावरण पुष्कळ प्रमाणात प्रदूषित होते. त्यामुळे शासनाने यावर उपाययोजना करायला हवी. ते त्यांचे दायित्व आहे.
२ आ. ‘भारतात ‘इन्सुलिन’चा अतीवापर ’, ही चिंतादायक गोष्ट असून आधुनिक वैद्य आणि मधुमेही रुग्ण यांची मानसिकता पालटणे महत्त्वाचे असणे अन् ‘इन्सुलिन’ चालू करण्याऐवजी मधुमेह होण्याची मूलभूत कारणे दूर करणे आवश्यक !
श्री. राजीव सिंह : नुकत्याच प्रकाशित झालेल्या आपल्या अहवालानुसार भारतातील मधुमेहाचे बहुतांश रुग्ण विदेशात उत्पादित केल्या जाणार्या महागड्या ‘इन्सुलिन’वर अवलंबून आहेत. याविषयी सांगा.
श्रीमती फिओना : या क्षेत्रात काही अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. औषधनिर्मिती करणारी आस्थापनेच ‘इन्सुलिन’च्या वापरासंदर्भात आग्रही असून अशा आस्थापनांच्या प्रभावामुळे आधुनिक वैद्यही मधुमेहाच्या रुग्णांना ‘इन्सुलिन’ चालू करतात. रुग्णांना जीवनशैलीतील पालटाविषयी योग्य मार्गदर्शन करण्याऐवजी थेट इन्सुलिन चालू करणे, हा त्यावरील योग्य पर्याय नाही. ‘इन्सुलिन’चा वापर ही अत्यंत चिंतादायक गोष्ट आहे; कारण ‘इन्सुलिन’ धोकादायक असून भारतात ते महाग आहे. ‘हा औषधनिर्मिती क्षेत्रांमधील घोटाळा आहे’, असे मला वाटते. ‘भारतातील मधुमेहग्रस्तांना ‘इन्सुलिन’ हे सर्वोत्तम औषध असून ते न घेतल्यास आपला मृत्यू होईल’, असे वाटते. त्यामुळे भारतात बहुसंख्येने असणारे रुग्ण असाहाय्यपणे हे महागडे औषध घेण्यास सिद्ध होतात. मधुमेहाच्या रुग्णांना ‘इन्सुलिन’ चालू करण्याचा जो दबाव निर्माण केला जातो, त्याविरुद्ध आपण आवाज उठवायला हवा. भारतात मधुमेह हा एका साथीच्या रोगासारखा पसरत आहे. ‘मधुमेही रुग्णाला ‘इन्सुलिन’ चालू करणे’ हा पर्याय निवडण्यापेक्षा हा रोग होण्याची मूलभूत कारणे शोधून ती कारणे दूर करण्यासाठी धनाचा वापर करायला हवा.
रुग्णांनी आधुनिक वैद्यांना वस्तुनिष्ठ प्रश्न विचारून सत्य परिस्थिती समजून घ्यायला हवी आणि आवश्यकता वाटल्यास दुसर्या आधुनिक वैद्यांचे मत घ्यायला हवे. ‘आधुनिक वैद्य आणि रुग्ण यांच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण होणे’, ही काळाची गरज आहे.
२ इ. ‘सिझेरियन करणे सुरक्षित असते’, अशी मानसिकता रुग्णांमध्ये निर्माण होऊन ती जागतिक समस्या बनली आहे !
श्री. राजीव सिंह : भारतात नैसर्गिक प्रसुतीच्या तुलनेत ‘सिझेरियन’ शस्त्रकर्माने केल्या जाणार्या प्रसुतीची संख्या वाढली आहे. हे ‘इन्सुलिन’च्या समस्येसारखेच आहे का ?
श्रीमती फिओना : ‘सिझेरियन’द्वारे होणारी प्रसुती, ही केवळ भारताचीच नव्हे; तर जागतिक स्तरावरील समस्या आहे. भारत हा सांस्कृतिक देश असूनही येथे हे प्रमाण वाढले आहे. प्रसूतीतज्ञांना ‘सिझेरियन’ करणे सोईस्कर होत असून त्यातून त्यांना अधिक पैसा मिळतो. त्यामुळे ते रुग्णांमध्ये ‘सिझेरियन करणे सुरक्षित असते’, अशी मानसिकता निर्माण करत आहेत. काही मातांच्या बाबतीत ते सत्य असेलही; पण सरसकट सर्वांना हा नियम लागू होत नाही. ‘सिझेरियन’मध्ये मुळीच धोका नाही’, असे नसते. यात रुग्णाला दिली जाणारी भूल, पोटावर केले जाणारे शस्त्रकर्म आणि औषधे यांमुळे वैद्यकीय उपचार खर्चिक होतात. बाळाचा जन्म झाल्यावर पुन्हा पूर्ववत स्थितीला येण्यास मातेला अधिक कालावधी लागतो आणि पुढील प्रसूतीही अवघड होऊ शकते. ‘सिझेरियन’ ही एक जागतिक समस्या बनली आहे.
२ ई. ‘औषधांचा अतीवापर हानीकारक आहे’, याची जागरूकता रुग्णांमध्ये करणे आवश्यक !
श्री. राजीव सिंह : भारतात ग्राहकांमध्ये जागरूकता न्यून आहे.
श्रीमती फिओना : हो, असे असू शकेल. ग्राहक जागरूक झाल्यास त्याचा पुष्कळ लाभ होऊ शकतो. यासाठी लोकशिक्षणाची आवश्यकता आहे. ‘अती औषधे घेणे, हे हानीकारक आहे’, हे लोकांना समजावून सांगायला हवे. रुग्णामध्ये तो घेत असलेल्या वैद्यकीय उपचारांविषयी चौकस वृत्ती निर्माण करायला हवी. रुग्णांनी पुढे येऊन प्रश्न विचारायला हवेत. त्याचप्रमाणे आवश्यकता असल्यास दुसर्या चिकित्सकांचे मत घेण्यासही त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. यासाठी वैचारिक परिवर्तन होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आधुनिक वैद्य आणि रुग्ण यांच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण होईल.
२ उ. भारतातील तज्ञ चिकित्सक आणि रुग्णालये यांमध्ये विलक्षण वाढ झालेली असून वैद्यकीय सोयी-सुविधांमध्ये लक्षणीय पालट झाला असणे
श्री. राजीव सिंह : वर्ष १९९० च्या आरंभी तुम्ही पहिल्यांदा भारतात आला होतात. त्या काळातील आणि सध्याचे औषधांचे क्षेत्र यात आपल्याला काही पालट जाणवतो का ?
श्रीमती फिओना : भारतात वैद्यकीय क्षेत्रात विशेष दर्जाची सेवा देणारे तज्ञ आधुनिक वैद्य आणि रुग्णालये यांमध्ये विलक्षण वाढ झाली आहे. ही वाढ उर्वरित जगाला लाजवणारी आहे. भारतातील आधुनिक वैद्यांची गुणवत्ता पाहून जगातील कित्येक देश आश्चर्यचकित होतात. भारतातील वैद्यकीय सोयी-सुविधांमध्ये झालेला संख्यात्मक आणि गुणात्मक पालट हा दुसरा लक्षणीय पालट आहे. तो पाहून डोळे दिपून जातात.
२ ऊ. भारतात राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी प्राथमिक आरोग्य सुविधांची गुणवत्ता सुधारलेली नसणे, तसेच आधुनिक वैद्यांना ताणाखाली काम करावे लागणे
श्री. राजीव सिंह : भारतातील वैद्यकीय क्षेत्रात कोणते पालट झालेले नाहीत ?
श्रीमती फिओना : भारतात विशेष सेवा देणारे तज्ञ आधुनिक वैद्य आणि रुग्णालये यांवर पुष्कळ पैसा अन् ऊर्जा व्यय केली जाते; पण अजूनही प्राथमिक आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेत पालट झाला नाही, ही चिंतेची गोष्ट आहे. प्राथमिक आरोग्य सुविधांमध्ये पालट घडवून आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारे आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना अधिक प्रमाणात आर्थिक मोबदला द्यायला हवा. भारतात आधुनिक वैद्यांना ज्या ताणाखाली काम करावे लागते, तो ताणही न्यून झालेला दिसत नाही.
२ ए. भारतात ‘रुग्ण आणि आधुनिक वैद्य यांच्यातील बिघडलेले संबंध’, ही चिंतेची गोष्ट असून यासाठी दोन्ही स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक !
श्री. राजीव सिंह : भारतात आणखी काही अपप्रवृत्तीजाणवतात का ?
श्रीमती फिओना : भारतात रुग्ण आणि आधुनिक वैद्य यांच्यातील बिघडलेले संबंध, ही चिंतेची गोष्ट आहे. काही वेळा आधुनिक वैद्यांना रुग्णांच्या शिवीगाळीला आणि आक्रमणांना तोंड द्यावे लागते. चीनमध्येही हे घडत आहे. आधुनिक वैद्य आणि औषधोपचार यांच्या बाबतीत रुग्णांच्या अवास्तव अपेक्षा आहेत. मात्र याला दुसरी बाजूही आहे, वैद्यकीय क्षेत्राकडून उपचारांविषयी अनावश्यक आशा दाखवली जाते. रुग्णांना औषधांचा खर्च भागवण्यासाठी कर्ज काढावे लागते. प्रसंगी स्वतःची मालमत्ता विकून अन् दिवाळखोर होऊन उपचार करावे लागतात. रुग्णांसाठी हे क्लेशदायी निर्णय असतात. याचा विचार व्हायला हवा.
२ ऐ. भारतात रुग्णांना स्वतःच्या औषधांसाठी स्वतःच व्यय करावा लागत असून औषधविक्री वाजवी मूल्यात करण्यासाठी औषध-निर्मिती करणार्या आस्थापनांना प्रवृत्त करायला हवे !
श्री. राजीव सिंह : औषधांच्या विक्रीमूल्यावर नियंत्रण ठेवल्यास वैद्यकीय उपचार (आरोग्य सुविधा) सर्वांना परवडू शकतील का ?
श्रीमती फिओना : भारत शासन औषधांचे विक्रीमूल्य नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. संपूर्ण जगात औषधांचे विक्रीमूल्य अवाजवी आहे. याविषयी औषध-निर्मिती करणारी आस्थापने ‘औषधांचे संशोधन आणि विकास यांसाठी पुष्कळ खर्च येत असल्याने तो भरून काढण्यासाठी औषधांचे विक्रीमूल्य अधिक ठेवावे लागते’, असे स्पष्टीकरण देतात. यासंदर्भात औषध-निर्मिती करणार्या आस्थापनांना किंमतीत पालट करण्यास प्रवृत्त करायला हवे. भारतात औषधांच्या किंमती अवास्तव असल्याची समस्या उघडपणे लक्षात येते; कारण येथे लोकांना स्वतःच्या औषधांसाठी स्वतःचे पैसे व्यय करावे लागतात. (विदेशात लोकांना औषधांसाठी इन्श्युरन्स असतो, तसेच लोकांना शासनाकडून अल्प मूल्यात औषधेही मिळतात. व्यक्तीने जेवढ्या रकमेचा विमा उतरवलेला असतो, तेवढी रक्कम विमा कंपनी देते. केवळ उर्वरित रक्कम रुग्णाला भरावी लागते.)’
(संदर्भ : दि इकॉनॉमिक टाईम्स, २०.११.२०१६)
संग्राहक : डॉ. मनोज सोलंकी, संस्थापक सदस्य, आरोग्य साहाय्य समिती
वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’ची मोहीम !
वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव, तसेच आपल्या परिसरात अनुचित घटना घडत असल्यास त्याविषयी आम्हाला त्वरित कळवा.
चांगले आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना नम्र विनंती ! : पैसे लुबाडणार्या आधुनिक वैद्यांची नावे उघड करण्यासाठी कृपया आम्हाला साहाय्य करा. ही तुमची साधनाच असेल. तुम्हाला तुमचे नाव गोपनीय ठेवण्याची इच्छा असल्यास ते गोपनीय ठेवण्यात येईल.
आपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता
सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा – ४०३ ४०१.
संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०
इ-मेल पत्ता : [email protected]