हिंदु राष्ट्र स्थापन करणे हा आमचा घटनात्मक अधिकार : विजय पाटील, हिंदु जनजागृती समिती
नवसारी (गुजरात) : भारतातील धर्मनिरपेक्ष शासनप्रणालीमुळे हिंदु राष्ट्राची मागणी करणे हे राज्यघटनेच्या विरुद्ध आहे, असा आरोप केला जातो; मात्र आणीबाणीच्या वेळेस राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्षता’ शब्द त्यात टाकून भारताला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ बनवले गेले, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. जर ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द घालून भारत ‘धर्मनिरपेक्ष’ होऊ शकत असेल, तर प्राचीन काळापासून जो ‘हिंदु राष्ट्र’ आहे तो भारत ‘हिंदु राष्ट्र’ का नाही होऊ शकणार? हिंदु राष्ट्र स्थापन करणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांनी येथे समितीद्वारे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये केले. नवसारी दुधिया तलाव स्थित श्री रामजी मंदिर येथे ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला नवसारी, सुरत, महुवा, वापी आणि उमरगाम येथील विविध धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
सभेचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. सभेमध्ये समितीच्या कार्याची ओळख श्री. संतोष आळशी यांनी करून दिली. या वेळी सनातनच्या विविध विषयांवरील ग्रंथांचे, तसेच सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.