रायगड : येथील अनुक्रमे पेण आणि पनवेल तालुक्यातील साई अन् नांदगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आल्या. समितीचे श्री. योगेश ठाकूर यांनी उपस्थितांना ‘धर्मशिक्षणाची आवश्यकता, धर्मावर होणारे आघात आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’ या विषयावर मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, ‘‘धर्मशिक्षणाच्या अभावामुळे येणारी भावी पिढी पाश्चात्त्यांच्या कुसंस्कारांना बळी पडत आहे. आजची तरुण पिढी क्रिकेट खेळता-खेळता त्या माध्यमातून व्यसनाधीन होत आहे. ‘डे’ सारखी विकृती आम्हाला धर्मापासून दूर नेत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करायला हवे. यातूनच समाज सात्त्विक बनून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेस प्रारंभ होईल.’’ नांदगाव आणि साई येथे अनुक्रमे ५० आणि १७० धर्मप्रेमी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. ८९ वर्षांचे एक आजोबा सभेच्या ठिकाणी तरुणांना सभेसाठी प्रोत्साहित करत होते.
२. साई गावातील आदिवासी पाड्यांवर होणारे धर्मांतर रोखण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करू, हे उपस्थित तरुणांनी विचारून घेतले आणि धर्मशिक्षण वर्गाची मागणी केली.
३. या वेळी ‘मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम’ याविषयी पडद्यावर ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.