देशभरात हिंदु जनजागृती समितीसह राष्ट्रप्रेमी संघटना आणि पक्ष यांनी २५ हून अधिक ठिकाणी आंदोलनाद्वारे नोंदवला निषेध !
प्रयागराज येथे आंदोलन करतांना साधू, संत आणि हिंदुत्वनिष्ठ
मुंबई / नवी देहली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गोरीपोरा येथील महामार्गावरून जात असलेल्या सीआर्पीएफ्च्या पोलिसांवरील आतंकवाद्यांच्या आक्रमणात ४२ पोलीस हुतात्मा झाल्यानंतर देशभरातील राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यामध्ये संतप्त पडसाद उमटले आहेत. भारतभरात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीसह समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, अनेक राष्ट्रप्रेमी संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनी पाकच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत आंदोलने करून पाकवर प्रतिआक्रमण करण्याची मागणी केली. उत्तर भारतात प्रयागराज आणि आगरा या ठिकाणी; कर्नाटकात ९ ठिकाणी, तर महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, जळगाव, कोल्हापूर, तसेच गोवा आदी अनेक ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांनी पाकविरोधात सैन्य कारवाई करून त्याला नामशेष करण्याची मागणी सरकारकडे केली.
पाकिस्तानवर सैनिकी कारवाई करून त्याला नामशेष करा ! – राष्ट्रप्रेमींची मागणी
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पोलिसांवर झालेल्या आक्रमणाचा सूड घेण्यासाठी केंद्रशासनाने जनभावना लक्षात घेत आतंकवादाच्या निर्मितीचे केंद्र असलेल्या पाकच्या विरोधात तातडीने कारवाई करून त्याला नामशेष करावे, तसेच काश्मीरमधील फुटीरतावाद्यांचे संरक्षण काढून त्यांना अन्य राज्यांतील कारागृहात बंद करावे, अशी मागणी राष्ट्रप्रेमींनी केली आहे. १५ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीने देशभरात विविध ठिकाणी या आक्रमणाच्या निषेधार्थ आंदोलन केले. त्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रप्रेमींनी ही मागणी केली.
या आंदोलनाच्या वेळी समितीने म्हटले की, ‘सर्जिकल स्ट्राईक’ करूनही पाकिस्तानच्या वागणुकीत कोणताच पालट झालेला नाही. आतंकवादी आणि पाक सैनिक यांनी भारतीय सैनिकांना ठार करणे, हा पाकच्या अघोषित युद्धाचाच एक भाग आहे. आणखी किती सैनिक हुतात्मा झाल्यावर भारतीय शासनकर्ते जागे होणार आहेत ? केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे सैनिकांचा शत्रूराष्ट्राकडून बळी जात असेल, तर येत्या काळात सैनिकांसह देशभरात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. अमेरिकी नागरिकांवर आक्रमण होण्याची केवळ सूचना मिळाल्यावर अमेरिकेने २० इस्लामी देशांतील त्यांचे दूतावास बंद केले. याचा अभ्यास करता भारताने आता विविध पातळ्यांवर पाकिस्तानला त्याची जागा दाखवायला हवी. भारतीय सैनिकांचा बळी घेणार्या पाकिस्तानशी भारताने आता कोणत्याही प्रकारची चर्चा न करता थेट सैनिकी कारवाईद्वारे चोख प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी आंदोलनामध्ये करण्यात आली.