रामनाथी (गोवा) : उद्योगपतींनी भावनेपोटी कोणाला साहाय्य करण्यापेक्षा सत्पात्रे दान करावे. संत, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाकरता कार्य करणार्या संस्था किंवा संघटना यांच्या कार्यासाठी दान करणे, हा धर्मकार्यातील सहभागच असतो. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सत्त्वगुणी उद्योगपती आणि व्यावसायिक यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे यांनी केले.
येथील सनातनच्या आश्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत ‘उद्योगपती साधना शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नांदेड येथील उद्योगपती श्री. गणेश महाजन आणि श्री. नागेश गाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी शिबिराचा उद्देश सांगतांना श्री. गाडे पुढे म्हणाले, ‘‘धर्मकार्यात अन्य उद्योगपतींना जोडणे, त्यांचे संघटन करणे, हिंदुद्वेष्ट्यांकडून आक्रमण झालेल्या हिंदूंना साहाय्य करणे, पुढे येणार्या आपत्काळात हिंदुत्वनिष्ठांना अन्न, वस्त्र आणि निवास यांची व्यवस्था करून देणे, अशा प्रकारे योगदान दिल्याने उद्योगपतींची समष्टी साधनाच होणार आहे.’’
या ३ दिवसीय शिबिरात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील १० उद्योजक सहभागी झाले होते. शिबिरात हिंदु जनजागृती समितीच्या अश्विनी कुलकर्णी यांनी सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची, तसेच हिंदु राष्ट्राची मूलभूत संकल्पना आणि आवश्यकता याविषयी माहिती दिली. या शिबिरात व्यापारी क्षेत्रांत काम करतांना ‘स्वत:तील षड्रिपूंमुळे येणारा ताण आणि अपयश यांवर मात करून आनंदी कसे रहावे आणि गुरुकृपायोगानुसार साधना कशी करावी ?’, या विषयी श्री. नागेश गाडे यांनी, तर ‘तणावमुक्तीसाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ या विषयावर ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. वृषाली कुंभार यांनी मार्गदर्शन केले. एस्.एस्.आर.एफ्.चे देश-विदेशातील कार्याविषयी सौ. स्मिता खरे यांनी माहिती दिली. शिबिरात ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात उद्योगपतींचे योगदान’ या विषयावर घेतलेल्या चर्चासत्रात उद्योगपतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि विद्यालयाचे शोधकार्य, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांवर होणारे आरोप आणि वास्तव, वाईट शक्तींमुळे होणारे त्रास अन् आध्यात्मिक उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या सांगतेच्या वेळी उद्योगपतींनी मनोगत व्यक्त केले.
१. सनातनच्या आश्रमात आल्यावर चांगले वाटले. संस्थेविषयी ऐकले होते, त्यापेक्षा अधिक पहायला आणि शिकायला मिळाले. – उद्योगपती श्री. गणेश महाजन, नांदेड
२. ‘आय.एस्.ओ. स्टॅण्डर्ड’ पेक्षा उत्तम असे आश्रमाचे व्यवस्थापन आहे. – उद्योगपती श्री. अजित यादव, बेळगाव
३. शिबिरात विविध गोष्टी शिकता आल्या. त्याचा साधनेसाठी लाभ झाला. – उद्योगपती श्री. दिनेश चासकर, नवी मुंबई