‘अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषदे’च्या प्रयागराज येथे आयोजित वार्षिक संमेलनात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग’
प्रयागराज (कुंभनगरी) : सध्या ब्राह्मण समाज संकटात आहे. जाती-जातींमध्ये विद्वेश करणारे ब्राह्मण समाजाला लक्ष्य करत आहेत. या संकटांचा प्रतिकार करायचा असेल, तर ब्राह्मण समाजाने स्वत: साधना करून स्वत:तील ब्राह्मतेज वाढवले पाहिजे. ब्राह्मतेज म्हणजे साधनेचे बळ होय, तसेच ब्राह्मणविरोधी प्रचार करणार्यांचे क्षात्रतेजाने धर्मशास्त्रीय खंडण केले पाहिजे. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज असलेले भगवान परशुराम हे यासाठी आपले आदर्श आहेत. ब्राह्मण समाजाने केवळ जातीच्या नव्हे, तर धर्माच्या व्यापक रक्षणासाठी काळानुसार ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे जागरण करावे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले. ते अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषदेच्या वार्षिक संमेलनात विशेष अतिथी म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपिठावर महामंडलेश्वर श्री संतोषदास सतुआ बाबा आणि विशेष पोलीस अधीक्षक तथा अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जुगलकिशोर तिवारी उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करतांना श्री. जुगलकिशोर तिवारी म्हणाले, ‘‘सनातन संस्था धर्मशिक्षण आणि धर्मरक्षण यांसाठी आजच्या काळात अद्वितीय कार्य करत आहे.’’ पत्रकार कु. अभिलाषा शर्मा विषय मांडतांना म्हणाल्या, ‘‘सनातन संस्थेने वैज्ञानिक संशोधन करून हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. त्यांचे कार्य खरोखर प्रशंसनीय आहे.’’