वर्धा : आपल्या मुलांना शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये धर्मशिक्षण दिले जात नाही. माताही त्यांच्या मुलांना शिवबा आणि जिजाऊ यांचे धडे शिकवण्यास विसरून गेल्या आहेत. धर्माचरणाअभावी हिंदु तरुण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या दुर्बल आणि ध्येयहीन झाले आहेत. नवनवीन जिहाद, धर्मांतर, मंदिरांचे सरकारीकरण आदींमुळे धर्म संकटात असतांना स्वत:सह राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्याकरता हिंदूंनी धर्माचरण करणे, तसेच त्यांचे प्रभावी संघटन करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्यावर गोप-गोपींनी काठ्या लावल्या होत्या, त्याप्रमाणे धर्म संकटात असतांना आपणही धर्माच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ फेब्रुवारी या दिवशी सेलसुरा (जिल्हा वर्धा) येथील हनुमान मंदिर देवस्थान येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या सभेला १२५ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती चौधरी म्हणाल्या, ‘‘दैनंंदिन जीवन आनंदी होण्यासाठी आपण दिवसभरात कशा प्रकारे वागायला पाहिजे, हे आपल्या धर्मात सांगितले आहे; परंतु आपण धर्माने सांगितलेल्या आचरणापासून लांब जात आहोत. धर्माचरणाअभावी समाज, तसेच कुटुंब यांची सात्त्विकता खालावत चालली आहे. परिणामी एकूणच जीवनात भीती, दु:ख, निराशा, असुरक्षितता, अस्थिरता वाढीस लागली आहे. त्यामुळे प्रत्येकाने साधना, तसेच धर्माचरण करून आपली सात्त्विकता वाढवणे आवश्यक आहे. तरच समाजाची सात्त्विकता वाढून स्थिरता निर्माण होऊ शकते.’’