कुंभमेळा प्रयागराज २०१९
प्रयागराज (कुंभनगरी) : भाव-भक्तीचा संगम असलेल्या कुंभनगरीतील गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमामध्ये अनुमाने दीड कोटी भाविकांनी १९ फेब्रुवारी या दिवशी माघ पौर्णिमेला स्नान केले. ‘हर हर महादेव’च्या गजरात त्रिवेणी संगमासह ८ किलोमीटर परिसरातील ४० घाटांवर भाविकांनी स्नान केले. कुंभपर्वातील हे ५ वे स्नान होते.
१. या स्नानासाठी २ दिवस अगोदरच भाविकांचा जनसागर कुंभनगरीत आला होता. विविध आखाडे आणि संप्रदाय यांचे भक्तगणही २ दिवसांपासून कुंभनगरीत आले. त्यांच्यासाठी कथा, प्रवचन आणि भजन यांचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. यामुळे संपूर्ण कुंभनगरीच जणू हरिनामात तल्लीन झाली होती.
२. माघ स्नानासाठी आलेल्या शेकडो भाविकांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरीत लावण्यात आलेले ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांच्या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन अनमोल अशी ज्ञानगंगाही घरी नेली. संस्थेच्या वतीने भूमा निकेतन येथे लावण्यात आलेल्या ‘फॅक्ट’निर्मित प्रदर्शनाला भाविकांनी भेट दिली. या वेळी राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात सहभागी होण्याची भाविकांनी सिद्धता दर्शवली.
३. पुलवामा येथील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर येथे अधिक कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये एन्एस्जी आणि एटीएस् कमांडो यांचाही समावेश होता. त्याचप्रमाणे उत्तरप्रदेश राज्याचे पोलीसदल, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय सुरक्षारक्षक दल, बॉम्बशोधक पथक स्नानघाट परिसरात तैनात करण्यात आले होते.
‘ड्रोन’च्या साहाय्याने घाटाच्या परिसरात लक्ष ठेवण्यात येत होते. सुरक्षेची उपाययोजना म्हणून कोणालाही या परिसरात खासगी ‘ड्रोन’ उडवण्याची अनुमती दिली नव्हती. सुरक्षेचा उपाय म्हणून शहरात ‘पास’ (अनुमती) नसलेल्या वाहनांना वाहतुकीला मनाई करण्यात आली आहे.
४. प्रयागराजमधील शाळा आणि महाविद्यालये यांंना ३ दिवस सुट्टी देण्यात आली आहे. कुंभपर्वाची औपचारिक समाप्ती मार्च मासात महाशिवरात्रीनंतर होणार आहे. असे असले, तरी मागील पंचमीच्या स्नानानंतर २५ टक्के मेळा रिकामी झाला असून आजच्या माघ पौर्णिमेच्या स्नानानंतर शेकडो साधू, महंत आणि भाविक परतीच्या मार्गावर लागले आहेत.