हिंदु राष्ट्र आल्यावर सर्व समस्या दूर होतील : सौ. वेदिका पालन
ठाणे : आज तरुण मुलांवर सर्वांत मोठा वाईट परिणाम होत असेल, तर तो चित्रपटांचा. आज चित्रपटांच्या माध्यमातून चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. हिंदु संस्कृतीविषयीही चुकीचे चित्रण दाखवले जात आहे. परिणामी आज तरुणांना तेच खरे वाटत आहे. हे एक षड्यंत्र आहे. वैद्यकीय क्षेत्रातही भ्रष्टाचार होत आहे. काही रुग्णालयांत मृत रुग्णाला कृत्रिम श्वास देऊन (व्हेंटिलेटरवर ठेवून) जिवंत असल्याचे भासवले जाते आणि त्याच्या कुटुंबियांकडून वारेमाप पैसा उकळला जातो. मोदी सरकारने हज यात्रेचे अनुदान बंद करून ‘शादी-शगुन’ योजना चालू केली आहे. ज्यात आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना १८ सहस्र रुपये एवढी रक्कम दिली जाते. धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या अशा अनेक समस्या डोके वर काढून उभ्या आहेत. हिंदु राष्ट्र आल्यावर सर्व समस्या दूर होतील, असे भाकीत संतांनी आधीच करून ठेवले आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांनी केले. विनायकेश्वर शिवमंदिर, बदलापूर (पूर्व) येथे १७ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. त्या वेळी त्या बोलत होत्या. अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी हिंदु जनजागृती समितीची माहिती सांगितली, तर सौ. सविता लेले यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.
डोंबिवली (पूर्व) येथील शास्त्री सभागृहात, तर सापे गाव, भिवंडी येथील श्रीकृष्ण मंदिराच्या सभागृहात हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडल्या. वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी डोंबिवली येथील सभेत धर्मप्रेमींना संबोधित केले, तर भिवंडी येथील सभेत श्री. नरेंद्र सुर्वे हे वक्ते होते.
श्री. प्रशांत सुर्वे यांनी भिवंडी येथील सभेत हिंदु जनजागृती समितीची ओळख करून दिली, तर डोंबिवली येथे समितीच्या कार्याची माहिती देणारा लघुपट दाखवण्यात आला.
शंखनाद आणि वेदमंत्रोच्चारण करून आरंभ झालेल्या सभांमध्ये ११ वेळा दत्ताचा नामजप करून पुलवामा येथील आक्रमणात हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. धर्मशिक्षणाची आवश्यकता, साधनेचे महत्त्व, लव्ह जिहाद, धर्मांतर, मंदिर सरकारीकरण यांसारखे धर्मावरील आघात आणि उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन करून सर्वच वक्त्यांनी आगामी हिंदु राष्ट्राची दिशा उपस्थित धर्मप्रेमींना दिली. सभेच्या अखेरीस सर्वांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली. सर्व सभांमध्ये १०० जण उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर
बदलापूर – समर्थ रामदास संप्रदायाचे आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून कार्य करणारे श्री. परागबुवा रामदासी, भाजपचे नगरसेवक श्री. सूरज मुठे, विनायकेश्वर शिवमंदिराचे विश्वस्त श्री. समीर कोंडीलकर, गांधी चौक येथील श्री हनुमान मंदिराचे विश्वस्त श्री. संदीप देवधर, आसाराम बापू संप्रदायाचे श्री. वडतकर आणि श्री. दयाशंकर तिवारी
भिवंडी – ह.भ.प. तरणे महाराज
डोंबिवली – ह.भ.प. रामदास महाराज, ज्येष्ठ शिवसैनिक तात्यासाहेब माने
क्षणचित्रे
१. बदलापूर येथे एक धर्मप्रेमी लोकलगाडीमध्ये चालू असलेली चर्चा ऐकून सभेला आले होते.
२. भिवंडी येथे सभेच्या सिद्धतेसाठी स्थानिक तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले. सभेनंतर वक्त्यांशी चर्चा करण्यासाठी ६० तरुण थांबले होते.