सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड आक्रमणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मूकमोर्चे काढण्यात आले. तसेच हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चौकाचौकांत मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.
पाटण तालुक्यातील कवठे बुद्रुक येथे शेकडो युवकांनी हुतात्मा भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. सातारा तालुक्यातील लिंब-गोवे येथील युवकांनी संघटित होऊन ‘भारतमाता की जय’, ‘हुतात्मा सैनिक अमर रहे !’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या वेळी २५० हून अधिक राष्ट्रप्रेमी युवक आणि नागरिक उपस्थित होते. लोणंद येथील नगरपंचायत मैदानावर हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शेंद्रे येथील झेंडा चौकात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होत हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. दहिवडी येथे बाजारपेठ बंद ठेवून हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कराड शहरासह तालुक्यातील विविध गावांत मूकमोर्चे आणि मेणबत्ती मोर्चे काढून हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये विविध सामाजिक, राजकीय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या.
जिल्ह्यामध्ये स्वयंघोषित बंद !
आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील व्यापारी वर्गाने स्वयंघोषित बंद पाळला. बाजारपेठा, किरकोळ विक्रेते आदींनीही यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रिक्शा, वडाप वाहतूकदार यांनीही बंदमध्ये सहभाग घेतला.