जमशेदपूर (झारखंड) : पुलवामामध्ये ‘जैश-ए-महंमद’ या आतंकवादी संघटनेने केलेल्या आतंकवादी आक्रमणात ४२ सैनिक हुतात्मा झाले. देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणार्या आणि भारताची जगात अपकीर्ती करणार्या पाकिस्तानला भारतीय राज्यकर्त्यांनी चोख द्यावे, ही काळाची आवश्यकता आहे. आता आणखी किती सैनिक हुतात्मा झाल्यानंतर भारतीय राज्यकर्ते झोपेतून जागे होणार आहेत ? राजनैतिक इच्छाशक्तीच्या अभावामुळेच सैनिकांचा अशा प्रकारे बळी जात असेल, तर जवळच्या भविष्यात सैनिकांसमवेतच संपूर्ण देशात अस्थिरतेचे वातावरण बनण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे आतंकवादाचे केंद्र बनलेल्या पाकिस्तानवर सैनिकी कारवाई करून त्याला नष्ट करा, अशी मागणी राष्ट्रप्रेमींनी येथे केली. येथे या आतंकवादी आक्रमणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी ही मागणी करण्यात आली. या आंदोलनात जम्मू-काश्मीर अध्ययन केंद्राचे श्री. जयप्रकाश ओझा, जमशेदपूर ब्राह्मण समाजाचे श्री. अरुण तिवारी, स्वदेशी जागरण मंचचे श्री. कृष्णा चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. आशुतोष पांजा, अधिवक्ता श्री. अखिलेश सिंह, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आलोक पांडे आणि इतर राष्ट्रप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या आंदोलनाच्या समाप्तीनंतर राष्ट्रप्रेमींनी पंतप्रधानांच्या नावे लिहिलेले एक निवेदन पूर्व सिंहभूम जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी सुबोध कुमार यांना सुपूर्द करण्यात आले.