Menu Close

आपण धर्माचे रक्षण केल्यास धर्म आपले रक्षण करील : धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

श्री दत्त पद्मनाम पीठ, हिंदु धर्म आचार्य सभा यांची कवळे येथे धर्मसभा

फोंडा: सैनिक देशाच्या रक्षणासाठी आपले रक्त सांडतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाने धर्मरक्षणासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे. धर्मरक्षणाचे महत्त्व ऋषिमुनींनी सांगितले आहे. आपण धर्माचे रक्षण केल्यास धर्म आपले रक्षण करील, असे आवाहन श्री दत्त पद्मनाम पीठाचे धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी केले. कवळे येथे श्री शांतादुर्गा मंदिराजवळ श्री दत्त पद्मनाम पीठ आणि हिंदु धर्म आचार्य सभा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘धर्मो रक्षति रक्षित:!’ या नावाने या सभेचे आयोजन केले होते. या वेळी व्यासपिठावर इटलीचे महामंडलेश्‍वर शिवानंद स्वामी, गुरुमाऊली ब्रह्मीदेवी, मगोचे नेते डॉ. केतन भाटीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी मार्गदर्शनात पुढे म्हणाले, ‘‘हिंदु धर्म हा सनातन वैदिक धर्म आहे. ऋषिमुनींनी जन्माला घातलेला हा धर्म कुठल्याही एका देशापुरता मर्यादित नाही. तो विश्‍वव्यापी आहे. धर्मामुळेच मंदिरे उभी राहिली आहेत. पूर्वी भारत देश श्रीमंत आणि समृद्ध होता. परकियांनी येथे आक्रमणे करून येथील मंदिरे, धर्म आणि संस्कृती उद्ध्वस्त केली; मात्र आपल्या पूर्वजांनी मंदिरे, धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करण्याचे महत्कार्य केले आहे. मंदिरांमध्ये अलंकार आदी स्वरूपात येणारे अर्पण भक्तांचे शिक्षण, आरोग्य आदींसाठी, तसेच समाजावर योग्य संस्कार व्हावेत, यासाठी खर्चिले गेले पाहिजे. धर्माच्या नावाखाली मतांचे राजकारण करणे चुकीचे आहे. पाश्‍चात्त्य संस्कृतीकडे आकृष्ट होणार्‍या युवा पिढीने भारताचा समृद्ध इतिहास जाणून घ्यावा. तपोभूमी येथे सर्व राजकीय पक्षांचे नेते भेट देत असतात. सर्वांसाठी हे पीठ खुले आहे. पिठाला भेट दिल्यावर राज्यकर्त्यांवर तेथील सात्त्विकतेचा परिणाम होऊन त्यांच्या हातून समाजकार्य घडावे, असा यामागील उदात्त हेतू असतो. ‘राज्यकर्त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर करू नये’, असे आम्हाला वाटते. ज्या गायींनी आमच्या देवतांवर अभिषेक घातला, त्या गोमातेची आज हत्या होत आहे. गोमातेच्या रक्षणासाठी हिंदूंनी कृतीशील होणे आवश्यक आहे. काही इतर धर्मीय लोक हिंदूंना आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करतात. हे रोखण्यासाठी हिंदूंनी अशा लोकांना अद्दल घडवली पाहिजे.’’

इटलीचे महामंडलेश्‍वर शिवानंद स्वामी मार्गदर्शनात म्हणाले, ‘‘सनातन धर्म प्रत्येकाने मानला पाहिजे. धर्म आत्मिक ऊर्जा आणि बळ देतो.’’ सभेच्या प्रारंभी अंत्रुज महालातील ७३ मंदिरांच्या विश्‍वस्तांचा सन्मान करण्यात आला. श्री दत्त पद्मनाम पिठाचे कार्य २५ देशांत पोहोचले आहे. प्रारंभी स्वामीजींची पाद्यपूजा करण्यात आली. या वेळी स्वागत डॉ. केतन भाटीकर, प्रास्ताविक गुरुमाऊली ब्रह्मीदेवी आणि सूत्रसंचालन अधिवक्ता शेलार आणि भूषण भावे यांनी केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *