हिंदूंनी स्वत:तील त्रुटींना दूर करण्याची आवश्यकता ! – सागर जावडेकर, ‘दैनिक तरुण भारत’, संपादक, गोवा आवृत्ती
रामनाथी (गोवा) : जाती-पातीच्या भिंतींच्या आधारेच आज निवडणुका लढवल्या जात आहेत. हे दुर्दैवी आहे. निवडणुकीच्या काळात अन्य धर्मीय वृत्तवाहिन्यांकडून हिंदु धर्माचा भयंकर विकृत प्रचार केला जातो. हिंदु धर्मियांच्या मतांना ‘जातीयवादी’ ठरवले जाते, तर अन्य धर्मियांच्या मतांना ‘धर्मनिरपेक्ष (सेक्युलर)’ ठरवले जाते, हे अतिशय क्लेशदायक आहे. हिंदूंनी स्वत:तील त्रुटीही दूर करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा धर्माची हानी होणार आहे. त्यामुळे आरंभी आपल्यामध्येच परिवर्तन होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ‘दैनिक तरुण भारत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक श्री. सागर जावडेकर यांनी केले. ते रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात हिंदु जनजागृती समितीने २२ फेब्रुवारीपासून आयोजित केलेल्या ‘द्वितीय पत्रकार-संपादक अधिवेशना’त बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या अश्विनी कुलकर्णी आणि सनातन अध्ययन केंद्राचे समन्वय श्री. संदीप शिंदे उपस्थित होते. या अधिवेशनाला महाराष्ट्र, गोवा, केरळ, आंध्रप्रदेश आणि राजस्थान येथील राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी पत्रकार उपस्थित होते. श्री. संदीप शिंदे यांनी अधिवेशनाचे प्रास्ताविक करतांना ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे विचारमंथन व्हावे आणि वैचारिक समूह निर्माण करणे यांसाठी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे’, असे सांगितले. या अधिवेशनात ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात पत्रकारांचे योगदान’, ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ आदी विविध विषयांवर मार्गदर्शन अन् चर्चा करण्यात येणार आहे.
अधिवेशनाचा प्रारंभ शंखनादाने करण्यात आला. यानंतर सनातन पुरोहित पाठशाळेचे पुरोहित श्री. ईशान जोशी आणि श्री. सिद्धेश करंदीकर यांनी वेदमंत्रपठण केले. त्यानंतर श्री. सागर जावडेकर, दैनिक नवशक्तीचे पत्रकार श्री. मिलिंद चवंडके, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि सनातन प्रभात नियतकालिकांचे समूह संपादक श्री. नागेश गाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महान कार्य आणि सनातन संस्थेच्या कार्याची व्याप्ती’ याविषयी अश्विनी कुलकर्णी यांनी उपस्थितांना अवगत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कार्तिक साळुंके यांनी केले.