सध्या देशभर विशेषतः प्रसारमाध्यमे आणि क्रीडाक्षेत्रात एकच विषय चर्चिला जात आहे, तो म्हणजे पुलवामात आक्रमण करणार्या पाकशी क्रिकेट खेळायचे कि नाही ? खरेतर असले बिकडोक, निरर्थक आणि स्वाभिमानशून्य प्रश्न केवळ भारतातच निर्माण होऊ शकतात किंवा केले जाऊ शकतात. पुलवामा आक्रमण हे पाकने राष्ट्रावर केलेले आतापर्यंतचे सर्वांत मोठे आक्रमण आहे. यात आपण ४२ सैनिक गमावले आहेत. कोणी आपल्या घरावर आक्रमण करून आपल्या कुटुंबातील सदस्यांना मारून टाकले असेल, अशा वेळी कुटुंबातील कोणी बाहेर जाऊन क्रिकेट खेळेल का ? आणि खेळायला गेलाच, तर त्यास ‘असंवेदनशील’ किंवा ‘स्वाभिमानशून्य’ म्हणण्यापेक्षा ‘विकृत’ म्हणणे अधिक योग्य ठरेल. सध्या देशात असाच एक मोठा विकृत गट पाकशी क्रिकेट खेळण्याचा आग्रह धरत आहे. पुलवामा आक्रमणानंतर आणि त्यामागे पाकचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर देशातील सर्वसामान्य नागरिकांनी दाखवलेली एकजूट हा राष्ट्रहितासाठी आशेचा किरण आहे. देशभर ज्याने त्याने आपापल्या परीने स्वतःच्याच कुटुंबातील व्यक्तीचा बळी गेल्याच्या भावनेतून पाकच्या विरोधात रोष प्रकट केला आहे. व्यापारी वर्गाने एक दिवस व्यापार बंद ठेवून निषेध नोंदवला, सामान्य लोकांनी सामाजिक प्रसारमाध्यमांतून स्वतःच्या मनात खदखदणार्या रोषाला वाट करून दिली. सरकारने त्याच्या स्तरावर पाकला दिलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ (सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र) हा दर्जा काढून घेतला. आता भारतातून पाकमध्ये जाणार्या ३ नद्यांचे पाणीही रोखण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. संयुक्त राष्ट्रात पाकला एकाकी पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत. अशा सर्वच पातळ्यांवर शत्रूविरोधात संतापाची लाट असतांना पाकशी क्रिकेट खेळण्याचा आग्रह भारतातील दिग्गज खेळाडूंकडून व्हावा, हे संतापजनक आहे. पाकच्या विरोधात व्यापार बंद होऊ शकतो, पाणी बंद होऊ शकते, तर क्रिकेट का बंद होऊ शकत नाही ?
२ गुण महत्त्वाचे कि ४२ सैनिकांचे प्राण ?
मे-जुलै या कालावधीत विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. यामध्ये १६ जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. पुलवामा आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ‘आतंकवाद पोसणार्या देशाला क्रिकेट खेळू देऊ नये’, अशी मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आसीसीकडे) केली. आक्रमणानंतर देशात निर्माण झालेली पाकविरोधी लाट पहाता जनतेचा रोष ओढवून घेऊ नये, यासाठी बीसीसीआयने केलेली ही चलाखी किंवा तिचा दिखाऊपणा आहे; कारण आयसीसीला पाठवलेल्या पत्रात बीसीआयने कुठेही ‘आम्ही पाकच्या विरोधात खेळणार नाही’, असे म्हटलेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. हीच ती चलाखी. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी ‘पाकला २ गुण (कुठल्याही संघाने कुठल्याही कारणास्तव जर नियोजित सामना खेळण्यास नकार दिला, तर प्रतिस्पर्धी संघाला २ गुण बहाल केले जातात) देऊन टाकू शकत नाही’, असे विधान करून भारताने पाकशी क्रिकेट खेळले पाहिजे, असे अप्रत्यक्ष मत व्यक्त केले. तेंडुलकर यांना २ गुण महत्त्वाचे वाटतात; पण ४२ सैनिकांचे प्राण महत्त्वाचे वाटत नाहीत का ? ‘असे खेळाडू कधी देशासाठी खेळले असतील ? कि स्वतःचे वैयक्तिक विक्रम रचण्यासाठी ?’, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना न पडल्याविना कसा राहील ? २ गुणांची हानी सोसावी लागली, तरी आपल्या सर्व क्रिकेटपटूंनी ती आनंदाने सोसलीच पाहिजे; कारण शेवटी क्रिकेट किंवा कुठल्याही खेळापेक्षा राष्ट्र हे मोठे असते. सैनिक स्वतःच्या प्राणांचा त्याग करतात, तर भारतीय संघाला फुटकळ २ गुणांचा त्याग का करता येत नाही ? पाकशी न खेळल्यामुळे २ गुण जातील; पण स्वाभिमान आणि बाणेदारपणासाठी जनतेचे १०० गुण मिळतील, हे तेंडुलकरांसारख्या खेळाडूंना कोणीतरी सांगण्याची आवश्यकता आहे.
क्रिकेट हा शेवटी निवळ मनोरंजनाचा भाग आहे. त्यातून मूठभर खेळाडू, प्रायोजक आणि क्रिकेट संघटना यांच्याच तुंबड्या भरल्या जातात. यात कुठेही राष्ट्रहित वगैरेला थारा नसतो. त्यामुळे रणभूमीवर शूत्रविरुद्धचे खरेखुरे युद्ध जिंकायचे कि क्रिकेटचे सामने ?, हे खेळाडूंनी ठरवले पाहिजे. खरेतर देशात आज अभूतपूर्व युद्धजन्य स्थिती आहे. अशात कुठल्याही प्रकारचे खेळ खेळले जाऊ नयेत. त्यापेक्षा तोच वेळ राष्ट्रहितासाठी दिला जायला हवा. पुलवामा आक्रमणानंतर पाकशी क्रिकेट खेळणे म्हणजे ‘रोम जळत असतांना निरो फिडल वाजवत होता’, असे होईल. याचे किमान भान भारतीय खेळाडूंनी राखले पाहिजे आणि त्यांना ते लक्षात येत नसेल, तर सरकारने त्यांना ते करून दिले पाहिजे. पाकशी क्रिकेट न खेळण्याची मागणी ही प्रत्येक आक्रमणानंतर होतच असते. तथापि भारतीय क्रिकेट संघाने किंवा अन्य क्रीडाक्षेत्रातील संघांनी बाणेदारपणे आणि स्वाभिमानाने पाकवर बहिष्कार टाकला आहे, असे एकदाही झालेले नाही. म्हणूनच अनेक सामने जिंकूनही राष्ट्रहिताच्या कसोटीत भारतीय खेळाडू नेहमी पराभूतच होत आले आहेत. हे चित्र पालटण्याची आवश्यकता आहे.
‘बॅटींग’ येथे करा !
आयसीसी ही भारताकडे ‘सोन्याचे अंडे देणारी कोंबडी’, या दृष्टीतून पहाते. क्रिकेट विश्वात होणार्या आर्थिक उलाढालीत भारताचा वाटा अनुमाने ८० टक्के इतका प्रचंड आहे. यावरून आयसीसीला ‘भारताची किती आवश्यकता आहे’, हे लक्षात यावे. ही कोट्यवधी रुपयांची उलाढाल भारतीय दर्शकांच्याच जिवावर होते. म्हणूनच ‘पाकिस्तानला या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली, तरच आम्ही या स्पर्धेत सहभागी होऊ’, अशी मागणी भारताने केली, तर ती अमान्य होण्याची शक्यता अल्प आहे. त्यासाठी ‘बॅटींग’ करण्याची आवश्यकता आहे, ती येथे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात