आतापर्यंत स्वतःच्या कणाहीनतेमुळे आणि अमेरिकेच्या दबावामुळे भारताने पाकच्या विरोधात कठोर कारवाई केली नाही, ही वस्तूस्थिती आहे. आता ट्रम्प असे विधान करून पुन्हा भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेच भारतियांना वाटते !
वॉशिंग्टन : सध्या भारत आणि पाक यांच्यामधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून परिस्थिती धोकादायक आहे. आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. काश्मीरमधील तणाव न्यून व्हावा, अशी आमची इच्छा आहे. भारताने पुलवामा येथील आक्रमणात ४२ पोलीस गमावले आहेत. त्यामुळे भारत कठोर पावले उचलण्याच्या सिद्धतेत आहे. भारताची मनःस्थिती मी समजू शकतो, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. या आक्रमणानंतर भारताकडून एखादे आक्रमण होण्याच्या शक्यतेने पाकनेही युद्ध करण्याची धमकी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.
ट्रम्प पुढे म्हणाले की, पाकला अमेरिकेकडून १.३ अब्ज डॉलर्सचे (९२३४ कोटी रुपयांचे) आर्थिक साहाय्य दिले जात होते, ते आम्ही थांबवले आहे. पाकिस्तान अमेरिकेला अपेक्षित साहाय्य करत नसल्याने आम्ही साहाय्य थांबवले. आम्ही पाकसमवेत काही बैठका घेणार आहोत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात