सुमित सागवेकर यांनी धर्मप्रेमींना दिली हिंदु राष्ट्राची दिशा
सोलापूर : सध्या इंटरनेटच्या जगतामध्ये हिंदूचा पराक्रमी, गौरवशाली इतिहास आणि शौर्यशाली परंपरा आपण विसरत चाललो आहोत. परिणामी हिंदू युवकांचे पराक्रमी इतिहासाकडे दुर्लक्ष होत आहे. हिंदूंना आपल्या इतिहासाची आठवण रहावी आणि राष्ट्र अन् धर्म कार्यात त्यांनी सहभागी व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या शौर्यजागरण उपक्रमाच्या माध्यमातून येथे हिंदू युवकांचे संघटन करण्यात आले. येथील जुने घरकुल भागातील श्री परमेश्वरी देवी मंदिर, तसेच गीता मंदिर आणि कुंभारी येथील मा साहेब सभाग्रह येथे शौर्य जागरण उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाला हिंदू युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपक्रमात सहभागी झालेल्या युवकांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीप्रवण होण्याचा संकल्प केला.
या शौर्य जागरण उपक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी लोकशाहीची निरर्थकता, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या अभ्यासक्रमातील ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेली कूटनीती आणि हिंदूंना दिशाहीन करण्याचे षड्यंत्र याविषयी हिंदू युवकांशी चर्चा करण्यात आली. क्रांतीकारक, तसेच हिंदू राजे, महाराजे यांच्या पराक्रमाचे दाखले देत श्री. सुमित सागवेकर यांनी युवकांच्या चर्चेला हिंदु राष्ट्राची दिशा दिली.
विशेष : या वेळी सनातन संस्थेच्या वतीने राष्ट्र आणि धर्म यांविषयी ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते, तसेच हिंदु जनजागृती समितीचे क्रांतिकारकांचे ‘आठवावा प्रताप’ हे प्रदर्शनही लावण्यात आले होते. हे प्रदर्शन अनेक धर्मप्रेमींना आवडले आणि त्यांनी ‘असे प्रदर्शन आमच्या मंडळात आयोजित करा’, असे समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले.