हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना निवेदन
मुंबई : बिअरबार आणि मद्यालये यांना देवता अन् महापुरुष यांची नावे न देण्याविषयी शासकीय निर्णय असतांना आर्थिक प्रलोभनासाठी कायद्याला हरताळ फासून बिअरबार आणि मद्यालये यांना देवता अन् महापुरुष यांची नावे दिली जात आहेत. नवीन मद्यालये अथवा बिअरबार चालू करण्यापूर्वी वा या दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करतांना त्यांना देवता अन् महापुरुष यांची नावे नाहीत ना, याविषयी राज्य उत्पादन शुल्क विभागाने निश्चिती करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होतांना दिसून येत नाही. असे करणे म्हणजे शासनाने स्वतःच्या आदेशाला धाब्यावर बसवण्यासारखे आहे. याविषयी शासनाने कारवाई करावी, यासाठी शासनाकडे लक्ष वेधावे या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे आमदार श्री. बाळासाहेब मुरकुटे यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय संभूस आणि श्री. सतीश सोनार उपस्थित होते.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की,
- कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागांत ५० हून अधिक मद्यालये आणि बिअरबार यांना देवता अन् महापुरुष यांची नावे दिल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये जर एवढ्या संख्येने देवता आणि महापुरुष यांची नावे दुकानांना आढळत असतील, तर राज्यातील ग्रामीण अन् शहरी भागांत ही संख्या पुष्कळच मोठ्या प्रमाणात असेल, यात शंकाच नाही.
- राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत अनेक मद्यालये अन् बिअरबार यांची नावे ‘कृष्णा’, ‘साई’, ‘साईपूजा’, ‘साईदर्शन’, ‘राधेश्याम’, ‘मुरारी’, ‘गोविंद’, ‘व्यंकटेश’, ‘लक्ष्मी’, ‘माऊली’, ‘नेताजी’ आदींसह हिंदूंच्या अन्य देवता आणि महापुरुष यांची नावे दिलेली आढळतात.
- हिंदु धर्मशास्त्रानुसार जेथे देवतेचे नाव किंवा चित्र असते, त्या ठिकाणी ‘शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांची एकत्रित शक्ती कार्यरत असते’, असे सांगितले आहे. या न्यायाने जेथे देवतेचे नाव आहे, त्या ठिकाणी साक्षात देवता आहे. मद्यपान करणे हे हिंदु धर्मशास्त्रात वर्ज्य सांगितले आहे. त्यामुळे मद्यालयांसारख्या हिंदूंना वर्ज्य असलेल्या ठिकाणांनाच देवतांची नावे देणे, हा देवतांचा घोर अनादर आहे. अशा कृतीमुळे पुष्कळ पाप लागते.
- केंद्रशासनाच्या ‘व्यापार चिन्ह कायदा कायदा १९९९’मधील कलम ९(२) बी नुसार व्यापारी उत्पादनावर ‘धार्मिक चिन्ह आणि चित्र’ मुद्रित करणे हा गुन्हा आहे. तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ आणि २६ नुसार प्रत्येक भारतीय नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य असून त्याचे रक्षण करणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. या प्रकरणी शासनाने वेळीच नोंद न घेतल्यास कायदा आणि सुव्यवस्था बिघडून त्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
हिंदु जनजागृती समितीच्या मागण्या
- जी मद्यालये आणि बिअरबार यांना देवता अन् महापुरुष यांची नावे दिली असतील, अशा विक्रेत्यांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी २९५ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात यावा.
- राज्याच्या सर्वदूर भागातील मद्यालये आणि बिअरबार यांच्या दुकांनावर असलेली हिंदूंच्या देवता अन् महापुरुष यांची नावे तात्काळ, तसेच ठराविक कालावधीत काढून टाकण्याचे आदेश राज्यशासनाने द्यावेत.
- जे अधिकारी आणि कर्मचारी कायद्यानुसार कार्यवाही करण्यास कर्तव्यचुकारपणा करतील, त्यांच्यावरही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.