मुंबई : पालटत्या काळानुसार ज्याप्रमाणे संघाच्या गणवेशात पालट करण्यात आला, त्याचप्रमाणे त्यांच्या हातात असलेल्या दंडुक्याच्या जागी एखादे शस्त्र द्यायला पाहिजे होते. संघाच्या दृष्टीने त्यांचे स्वयंसेवक हे कवायती, संचलन, व्यायामाचे प्रकार वगैरे करत असतात. त्यामुळे ही एक बिनहत्यारी फौज आहे. हातात लाठी असली, तरी सध्याच्या जमान्यात (काळात) लाठीस कोणी हत्यार मानायला सिद्ध नाही आणि लाठीने सध्याच्या स्थितीत लढताही येत नाही. त्यामुळे हातातील लाठीची जागा एखाद्या शस्त्राने घेतली असती, तर देशाच्या शत्रूशी लढता आले असते. सध्या जी धर्मांधता, आतंकवाद वाढला आहे, तो रोखण्याची ताकद आपल्या हातातील लाठीत आहे काय, याचाही विचार पालटत्या काळानुसार संघाला करावा लागेल, असे मत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रलेखात मांडण्यात आले आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की,
१. संघाने मोदी शासनाच्या माध्यमातून अयोध्येतील राममंदिराचा आणि समान नागरी कायद्याचा प्रश्न झटक्यात मार्गी लावावा. देशातील सत्तापालट हा संघाच्या रणनीतीमुळे आणि स्वयंसेवकांच्या कष्टामुळे झाला. मोदी शासनाकडून संघधुरिणांनी रखडलेली मोठी राष्ट्रकार्ये करून घेतली पाहिजेत.
२. संघ मंडळींच्या हातात लाकडी लाठी असली, तरी त्यांची डोकी राष्ट्रवादाने भारलेली आहेत आणि वनवासी क्षेत्रात त्यांचे काम वाखाणण्यासारखे आहे. ईशान्येकडील राज्यांतील दुर्गम भागात संघाच्या लोकांनी जे काम शांतपणे चालवले आहे, ते देशहिताचेच आहे. घरदार, संसार यांवर तुळशीपत्र ठेवून हे लोक इतक्या लांब जाऊन निष्ठेने काम करतात ते कौतुकास्पद आहे. या सगळ्यांचे देशप्रेम वादातीत आहे आणि हिंदु राष्ट्राचे स्वप्न आमच्याप्रमाणे ही मंडळीसुद्धा पहात आहेत.
३. भारतीय जनता पक्षाच्या धुरिणांना नागपुरात जाऊन मसलती कराव्या लागतात, यात चुकीचे काहीच नाही. जामा मशिदीच्या इमामापुढे वाकून त्याचे तळवे चाटणार्यांनी यावर नाके मुरडण्याची आवश्यकता नाही. ओवैसी, शहाबुद्दीनचे विष चालते; पण संघाचा राष्ट्रवाद चालत नाही, हे एक प्रकारे ढोंग आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात