राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात कृतीप्रवण होणे हीच हुतात्मा सैनिकांना खरी श्रद्धांजली ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद
रामपूर (जिल्हा सोलापूर) : आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेल्या सैनिकांना केवळ ‘व्हॉट्सअॅप’ आणि ‘फेसबूक’ या सामाजिक माध्यमांतून श्रद्धांजली अर्पण न करता राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात प्रत्यक्ष कृतीप्रवण होऊन खर्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करा, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले. श्री स्वामी समर्थ यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या रामपूर येथील महादेव मंदिरासमोर झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. दुर्गा कुलकर्णी व्यासपिठावर उपस्थित होत्या.
सभेच्या प्रारंभी प्रभु श्रीराम यांच्या चित्राला पुष्पहार अर्पण करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा आणि सभेचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके यांनी केले. सभेला पंचक्रोशीतील २५० धर्मप्रेमी उपस्थित होते. सभेचा प्रसार आणि सिद्धता धर्मप्रेमींनी स्वयंस्फूर्तीने केली होती. हिंदुत्वनिष्ठ श्री. आनंद महामणे, श्री. बाबूसिंह तिवारी, प्रदीप रेड्डी, सचिन कोटे, महादेव तिवारी, राजकुमार सुरवसे यांनी सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
विशेष घटना
१. सभेपूर्वी धर्मप्रेमींनी मान्यवर वक्त्यांची हलगी वाजवत उत्साहाने मिरवणूक काढली.
२. गावातील महिला गच्चीवर बसून सभेचा विषय ऐकत होत्या.
३. गावामध्ये सर्वत्र भगवे ध्वज लावण्यात आले होते, तसेच सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील प्रबोधनपर फलक प्रदर्शनही लावण्यात आले होते.
४. गावातील धर्मप्रेमी युवकांनी एकत्र येऊन स्वच्छतेपासून सजावटीपर्यंत सर्व सेवा उत्स्फूर्तपणे केल्या.
५. कुंभारी येथून श्री. गेनसिद्ध जवळे, श्री. राजशेखर नंदुर्गे आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.