इस्लामी देशांच्या परिषदेत भारताची भूमिका
‘आतंकवाद्यांच्या विरोधातील लढाई धर्माच्या विरोधात नसली, तरी एकाच धर्माचे लोक आतंकवाद का करतात ?’, हा प्रश्न कायम आहेच !
अबुधाबी : भारतात हिंदु आणि मुसलमान सौहार्दाने रहातात; पण पुष्कळ अल्प लोक कट्टरवाद्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. आतंकवाद केवळ धर्माला संपवण्याचे काम करतो. आतंकवादाच्या विरोधातील लढाई कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात नाही. इस्लामचा अर्थ शांतता आहे. अल्लाच्या ९९ नावांचा अर्थही ‘हिंसाचार’ असा नाही, असे मत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी येथे ५७ इस्लामी देशांच्या ओआयसी संघटनेच्या (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनच्या) परिषदेत मांडले. या परिषदेला सुषमा स्वराज या प्रमुख मान्यवर म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीमुळे पाकने या परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.
सुषमा स्वराज पुढे म्हणाल्या की,
१. संपूर्ण जग आतंकवादाने त्रस्त झाले आहे. आतंकवादाला संरक्षण आणि आश्रय देणार्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे. त्यांना होत असलेला वित्तपुरवठाही रोखला पाहिजे.
२. आतंकवादाच्या विरोधात केवळ सैन्य किंवा कूटनीती यांद्वारे लढले जाऊ शकत नाही. उलट धर्माचा खरा अर्थ समजून घेऊन त्याच्याशी लढा दिला जाऊ शकतो. यासाठी धर्म जाणणार्या विद्वानांनी समोर आले पाहिजे.
३. ऋग्वेदात म्हटले आहे की, देव एक आहे; पण लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे वर्णन करतात. हेच जगातील सर्व धर्मांत म्हटले आहे. आतंकवाद आणि कट्टरवाद दोन्ही एकच आहेत. इस्लामचा संदेश ‘शांतता’ आहे. (असे प्रत्यक्षात कुठेच दिसत नाही, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक) कुराणामध्ये म्हटले आहे की, धर्माची सक्ती असू नये. (प्रत्यक्षात त्याच्या उलट वागले गेले आहे आणि वागले जात आहे, याविषयीही सुषमा स्वराज यांनी सांगायला हवे होते ! – संपादक)