वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
वर्धा : कर्नाटक आणि मध्यप्रदेश येथील हिंदु नेत्यांवर होणारी आक्रमणे अन् निर्घृण हत्या यांमागील षड्यंत्राचा ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून सखोल तपास करण्यात यावा, तसेच देशांतर्गत आतंकवादाचे मूळ असलेले मदरसे आणि आतंकवादी कारवाया करणार्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर तात्काळ बंदी घालण्यात यावी, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ फेब्रुवारी या दिवशी वर्धा येथील विकास भवनासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारसाठी उपजिल्हाधिकारी श्री. संजय दयने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनामध्ये म्हटले आहे की, प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने देशात घातपाती कारवाया करण्याच्या सिद्धतेत असलेल्या संशयावरून जानेवारी महिन्यात मुंबई आतंकवादविरोधी पथकाने मुंबई आणि संभाजीनगर (औरंगाबाद) येथून ९ जणांना कह्यात घेतले. काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेश आणि राजस्थान या राज्यांतही पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई केली आहे. अटक केलेल्यांपैकी मुख्य आरोपी मदरशांतून कह्यात घेतला; तर एकाचा संबंध ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी आहे. केवळ संशयितांना पकडणे, हा वरवरचा उपाय न करता देशामध्ये अशी धर्मांध आणि देशविघातक वृत्ती निर्माण करण्याचे मूळ शोधून त्याचा बंदोबस्त करणे अपरिहार्य आहे. काही दिवसांपूर्वी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनीच देशातील मदरशांमध्ये आतंकवादाचे शिक्षण दिले जात असल्याचे जाहीरपणे सांगून ‘मदरशांवर बंदी घालायला हवी’ अशी मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे एका पत्राद्वारे केली आहे. तसेच मुंबईतील आतंकवादी आक्रमणानंतर संयुक्त राष्ट्र संघामधील पाकिस्तानचे तत्कालीन प्रतिनिधी अब्दुल्ला हुसैन हारून यांनीही ‘पाकिस्तानातील आतंकवादाची निर्यात भारतातील जनक देवबंद मदरशांमधून होते’, असे म्हटले होते.
यात पुढे म्हटले आहे की, हिंदु नेत्यांच्या हत्या होण्याचे प्रमाण विशेष करून केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांत लक्षणीय आहे. आता हे लोण मध्यप्रदेशातही पोहोचले आहे. मध्यप्रदेशमध्ये गेल्या महिन्यात केवळ दोन दिवसांत ४ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्यात आल्या. आतापर्यंतच्या या हत्यांमध्ये गुन्हेगार कोण आहेत ?, हे विविध अन्वेषण यंत्रणांना स्पष्ट असूनही संबंधित राज्य शासनाकडून या प्रकरणी विशेष कारवाई होतांना दिसत नाही. तरी या हत्या करणारे धर्मांध, त्यांच्याकडून हत्या करवून घेणारे सूत्रधार, तसेच ही प्रकरणे दडपण्यासाठी प्रयत्न करणारे यांचा माग काढून त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून सखोल चौकशी करणे अत्यावश्यक बनले आहे.