घोटाळ्यांवर घोटाळे करणारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती !
कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी देवी अंबाबाईच्या मालकी अधिकारातील मोरेवाडी येथील ८ एकर भूमी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अनधिकृतरित्या विक्री केली आहे. या प्रकरणात चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी प्रजासत्ताक या सामाजिक सेवा संस्थेचे कार्यकर्ते श्री. दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.
श्री. देसाई या वेळी म्हणाले की,
१. या व्यवहारात समितीतील तत्कालीन सदस्य श्री. दिगंबर निलकंठ यांची स्वाक्षरी फसवी आहे.
२. महसूल मंत्रालय आणि देवस्थान समितीचे पदाधिकारी यांनी संगनमताने हा व्यवहार केला आहे. अंबाबाई मालकी हक्कातील रि.स. क्रमांक ३२ आणि ४५ क्षेत्रातील ही भूमी विक्री करू नये, असे स्पष्ट आदेश शासनाने दिला आहे. असे असतांना अवैधरित्या या जागेची विक्री झाली आहे.
३. देवस्थानची मोरेवाडी-पाचगाव परिसरात ९० एकर भूमी आहे. पैकी पहिल्या टप्प्यात ८ एकराचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. काँग्रेस आणि भाजप-शिवसेना शासनाच्या कार्यकाळात हा व्यवहार झाला आहे. दोन्ही शासनाच्या काळातील समितीचे पदाधिकारी आणि उत्तरदायी शासकीय अधिकारी यांनी या गैरव्यवहारास पाठबळ दिले आहे.
४. या प्रकरणाला उत्तरदायी धरून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती विसर्जित करावी. १३ डिसेंबर २०१० या दिवशी समितीची झालेली सभा संशयास्पद आहे. त्यांच्या स्वाक्षर्या, हजेरी (उपस्थिती) पुस्तकातील खाडाखोड आणि विक्री दस्तऐवजावर केलेल्या स्वाक्षर्या संशयास्पद आहेत. वर्ष २००२-२००३ पासून हा गैरव्यवहार चालू आहे. अवैधरित्या भूमी विक्रीला स्थगिती घेण्याचा आमचा प्रयत्न असेल.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतील सदस्य
१. डॉ. अमित सैनी, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
२. राजेंद्र देशमुख, राष्ट्रवादीचे माजी आमदार, आटपाडी आणि सदस्य, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
३. हिरोजी परब, सिंधुदुर्ग, सदस्य, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
४. बी.एन्. पाटील-मुगळीकर, सदस्य, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
५. प्रमोद पाटील, इचलकरंजी, सदस्य, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
६. सौ. संगीता उदय खाडे, सदस्य, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात