हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीक्षेत्र आळंदी येथे कीर्तनकार संमेलन
श्री क्षेत्र आळंदी (जिल्हा पुणे) : कीर्तनसेवेच्या माध्यमातून हरिकथा सांगण्याच्या जोडीला राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात आणि त्यांच्या रक्षणाचे उपाय, तसेच हिंदूसंघटन यांविषयी प्रबोधन करण्याचा निर्धार कीर्तनकार-प्रवचनकार यांनी व्यक्त केला. साधारणत: प्रवचन-कथा यांच्या माध्यमातून पौराणिक कथा सांगून लोकांना भक्तीमार्गाला लावण्याची परंपरा आहे; पण सध्याचा काळ पहाता ब्राह्मतेजासह क्षात्रतेजाचाही जागर करणे आवश्यक आहे. त्याच उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोपाळपुरा येथील देविदास धर्मशाळेमध्ये १ मार्च या दिवशी एक दिवसीय कीर्तनकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळ, जालना या भागांतूनही काही महाराज मंडळी या संमेलनाला उपस्थित होती. उद्घाटन सत्रानंतर झालेल्या प्रबोधन सत्रात हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड, राष्ट्रीय वारकरी सेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष ह.भ.प. बाळू महाराज पाटील, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.
राष्ट्र-धर्म विषयक जागृती करणे, हे कीर्तनकारांचे कर्तव्यच ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड
राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात, त्यांच्या रक्षणाचे उपाय यांविषयी जागृती करणे, हे कीर्तनकारांचे कर्तव्यच आहे. प्रवचन, कथा, भागवत ही त्याची माध्यमे आहेत. ‘धर्माचे पालन करणे पाखंड खंडण’, असे संतांनीही सांगून ठेवले आहे. असे असूनही जर कीर्तन-प्रवचने या माध्यमांतून समाजाला दिशा देता येत नसेल, तर ती खेदाची गोष्ट आहे. दुर्जनांच्या दुर्जनतेपेक्षा सज्जनांची निष्क्रीयता अधिक घातक आहे. हिंदु धर्मातही काही ‘स्लीपर सेल्स’ आहेत, जे हिंदु धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यापासून दूर रहाण्याची आवश्यकता आहे. जे विरोधकही नाहीत आणि समर्थकही नाहीत, अशांपासून सावधानता बाळगा’, असे मत हिंदुभूषण श्याम महाराज राठोड यांनी व्यक्त केले. प्रवचनातून राममंदिराविषयी बोलणे, हा काही गुन्हा आहे का ?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कीर्तनातून हिंदु धर्माविषयी प्रबोधन केल्यानंतरच कीर्तनकारांचे प्रमाण सिद्ध होईल ! – ह.भ.प. बाळू महाराज पाटील
साधूसंतांनी संघटित होण्याची आता वेळ आली आहे. कीर्तनामधून केवळ पौराणिक कथा न सांगता धर्मरक्षणाविषयी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. ते केल्यानंतरच कीर्तनकारांचे खरे प्रमाण सिद्ध होईल.
मंदिर सरकारीकरणाच्या माध्यमातून देवनिधीवर डल्ला मारणार्यांकडून पै अन् पै वसूल करणार ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
सरकारीकरण झालेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर आणि इतर ३ सहस्र ६७ मंदिरांचा कारभार पहाणारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, मुंबई येथील श्री सिद्धीविनायक ट्रस्ट, साईमंदिराची व्यवस्था पहाणारे शिर्डी देवस्थान यांनी देवस्थानाचे कारभार पहातांना पराकोटीचा भ्रष्टाचार केला आहे. मंदिरांची व्यवस्था सुधारण्याच्या नावाखाली सरकारने या मंदिरांचे सरकारीकरण केले; मात्र त्यानंतर कित्येक पट अधिक भ्रष्टाचार केला. देवनिधीवर डल्ला मारणार्यांकडून पै अन् पै वसूल करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. कीर्तनकारांनीही हिंदु धर्माचा गाभा असलेल्या मंदिरांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडून जागृती करावी.
कीर्तनकार संमेलनातील क्षणचित्रे
१. उद्बोधन सत्रानंतर गटचर्चा घेण्यात आली. दोन गटांमध्ये विभागलेल्या महाराज मंडळींनी ‘राष्ट्र-धर्म कार्यासाठी कशाप्रकारे योगदान देता येऊ शकते’, याविषयी चर्चा केली. या वेळी प्रत्येक मासाला धर्मावरील आघातांच्या विरोधात एकत्रित आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले.
२. हिंदु धर्मविषयक माहितीचे भांडार असणार्या हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाची उपस्थितांना ‘प्रोजेक्टर’वरून माहिती देण्यात आली.
३. त्यानंतर शंकानिरसन आणि अनौपचारिक चर्चासत्र पार पडले. या वेळी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि श्री. सुनील घनवट यांनी उत्तरे दिली.
४. कार्यक्रमाची सांगता पसायदान म्हणून करण्यात आली.
कीर्तनकारांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया
१. ह.भ.प. माऊली महाराज मुरेकर : हिंदु धर्म विरोधकांच्या विरोधात कृती करणारच. आम्ही काही पैशांसाठी कीर्तने करत नाही. आम्हाला राजकारण नाही, तर समाजकारण आणि धर्मकारण करायचे आहे. राष्ट्र-धर्माचे कार्य करायचे असेल, तर आम्हाला कधीही हाक मारा. आम्ही नक्की येऊ.
२. कारभारी साहेबराव अंभोरे, जालना : मद्यबंदी व्हावी आणि गायरान भूमीवरील अतिक्रमणे हटावीत, यासाठी मी आतापर्यंत १७ वेळा आंदोलने केली आहेत. राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात आम्ही अनेक लोकांना घेऊन सहभागी होऊ.
कीर्तनकार संमेलनासाठी देविदास धर्मशाळेचे ह.भ.प. निरंजनशास्त्री कोठेकर महाराज यांनी त्यांची धर्मशाळा उपलब्ध करून दिली. समितीच्या उपक्रमांना त्यांचे कायम सहकार्य असते. समितीच्या वतीने श्री. अशोक कुलकर्णी यांनी त्यांचे आभार मानले.
विरोधाला न जुमानता समितीने अविरतपणे कार्य करत रहावे !- हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड
गंगेचे कार्य वहाणे आहे. गंगेचे पाणी कोण तीर्थ म्हणून घेत आहे कि कुणी त्या पाण्याचे कपडे धुत आहे कि कुणी अजून काय करत आहे, याच्याशी गंगेला घेणे-देणे नसते. त्याप्रमाणे विरोधाला न जुमानता अथवा त्यामुळे न अडखळता गंगेप्रमाणे अविरतपणे राष्ट्र-धर्म यांचे कार्य करत रहावे.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य रचनात्मक आहे. धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले, तर एकाही जणाचे पाऊल वाकडे पडणार नाही आणि कट्टर देशप्रेमी युवक निर्माण होतील, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
बुद्धीभेदाच्या प्रयत्नांना बळी न पडता विरोधकांना प्रतिप्रश्न करा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
शंकानिरसन सत्रात मार्गदर्शन करतांना अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘श्रीकृष्णाला १६ सहस्र स्त्रिया का होत्या ?, श्रीरामाने सीतामातेला अग्निदिव्य करायला का लावले ?, शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक करून ते वाया का घालवले जाते ?, अशा प्रकारचे प्रश्न विचारून साम्यवाद्यांकडून हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला जातो. या बुद्धीभेदाला बळी न पडता हिंदूंनी धर्माचा अभ्यास करून प्रतिप्रश्न विचारून त्यांना निरुत्तर करायला हवे. ‘रशियाने साम्यवाद स्वीकारूनही नंतर तो फेकून का दिला ? नक्षलवादी पोलीस, आदिवासी यांच्या हत्या का करत आहेत ? त्याविषयी आधी चर्चा करू’, असे प्रतिप्रश्न विचारायला हवेत. हिंदूंनी एक पाऊल मागे यायला नको, तर धर्माचा थोडा अधिक अभ्यास करून हिंदूंच्या विरोधकांचा सामना करायला हवा.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments