मंडला (मध्यप्रदेश) येथे हिंदु सेवा परिषदेच्या वतीने चतुर्थ साधना कार्यशाळेचे आयोजन
मंडला (मध्यप्रदेश) : सध्या हिंदु धर्माचे मानबिंदू असलेले गोमाता, गंगा, मंदिरे, संत आदींना काहीही घटनात्मक महत्त्व नाही. आंतरराष्ट्रीय सीमावाद, आतंकवाद, भ्रष्टाचार आदी सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्रातच उपाय शक्य आहे. अशा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी हिंदु सेवा परिषदेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत केले.
येथील सुरंग देवरी गोशाळेमध्ये नुकतीच ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला पू. रामदासजी महाराज, हिंदु सेवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जेसवानी, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनीही संबोधित केले. या वेळी जबलपूर, मंडला, सिवनी तसेच अन्य जिल्ह्यांमधील परिषदेचे १०० हून अधिक सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन सर्वश्री जमुनाप्रसाद विश्वकर्मा, संतोष कछवाह आणि अक्षय झा यांनी केले, तर आभारप्रदर्शन हिंदु सेवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. धर्मेंद्र सिंह यांनी केले.
तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण होण्यासाठी हिंदु सेवा परिषद प्रयत्न करते ! – अतुल जेसवानी, प्रदेशाध्यक्ष, हिंदु सेवा परिषद
तरुणांनी आदर्श नागरिक होण्यासाठी हिंदु सेवा परिषद गावोगावी सभांचे आयोजन करते. या माध्यमातून वर्तमान स्थितीविषयी हिंदूंमध्ये जागृती करते, तसेच तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी आणि त्यांनी पुढे देशाचे नेतृत्व करावे, यांसाठी संतांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यशाळांचे आयोजन करते.
भगवान श्रीकृष्ण आपल्या मनात राष्ट्र आणि धर्म प्रेम उत्पन्न करतील ! – आनंद जाखोटिया
सध्या देशाला स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणा सांगा यांची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ १६ वर्षांचे असतांना त्यांच्या मित्रांसमवेत हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा संकल्प केला आणि तो पूर्णही केला. हे केवळ साधनेमुळेच शक्य आहे. आपण साधना केली, तर भगवान श्रीकृष्ण आपल्या मनात राष्ट्र आणि धर्म प्रेम उत्पन्न करतील.
क्षणचित्रे
- मान्यवरांनी नर्मदा माता, गोमाता, भगवान श्रीकृष्ण, ओम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला प्रारंभ करण्यात आला.
- सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या शुभहस्ते गायीच्या वासराचे पूजन करण्यात आले. तेव्हा वासराने गोमयाचे विसर्जन केले. त्यामुळे शुभसंकेत मिळाला.
- ‘धर्माची सेवा खूप मन लावून करा’, असा आशीर्वाद पू. रामदासजी महाराज यांनी कार्यशाळेला उपस्थित सदस्यांना दिला.