गिरनार (जुनागढ, गुजरात) : येथील श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांची हिंदु जनजागृती समितीचे गुजरात समन्वयक श्री. संतोष आळशी, समितीचे कार्यकर्ते श्री. सुहास गरुड आणि श्री. गजानन नागपुरे यांनी भेट घेतली. महाराजांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला आशीर्वाद दिले. महाराजांनी गुजराती मासिक सनातन प्रभातचे वाचन केले.
महाराजांचे सनातन संस्थेच्या कार्याला साहाय्य
गिरनार येथील सुप्रसिद्ध मुचकुंद गुंफेमध्ये महाराजांचा आश्रम आहे. सनातनच्या साधिका सौ. शिल्पा पाटील महाशिवरात्रीसाठी सनातनचे ग्रंथ प्रदर्शन लावण्याची अनुमती मागण्यासाठी महाराजांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा महाराज दौर्यावर होते. तरीही त्यांनी दूरभाष करून साधकांची रहायची, जेवण आदी सर्व व्यवस्था आश्रमात करून दिली.
ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
२७ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत महाशिवरात्रीच्या निमित्ताने गिरनार पर्वताच्या पायथ्याशी श्री भवनाथ महादेवचा मेळा भरतो. अर्धकुंभच्या निमित्ताने हा मेळा भरला होता. या वेळेस संपूर्ण गुजरातमधून लाखो भाविक येत असतात. त्या वेळी ग्रंथ प्रदर्शनाला अनेक जिज्ञासूंनी भेट देऊन आध्यात्मिक माहिती, ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा लाभ घेतला.