Menu Close

प्रयागराज येथे महाशिवरात्रीच्या दिवशी १ कोटी १० लक्षांहून अधिक भाविकांचे त्रिवेणी संगमावर स्नान !

प्रयागराज(कुंभनगरी) : ४ मार्चला महाशिवरात्रीच्या दिवशी गंगा, यमुना आणि लुप्त सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमासह ४० घाटांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत १ कोटी १० लक्षांहून अधिक भाविकांनी ‘गंगामाता की जय हो’, ‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’, अशा जयघोषात स्नान केले. तसेच विश्‍वाच्या कल्याणासाठी अमृतमंथनाच्या वेळी निर्माण झालेले विष प्राशन करणार्‍या भगवान शिवाला वंदन केले.

  • या वर्षीच्या कुंभपर्वामध्ये मकरसंक्रात, मौनी अमावास्या आणि वसंत पंचमी या दिवशी संत, महंत यांचे राजयोगी स्नान झाले. पौष पौर्णिमा, माघी पौर्णिमा आणि महाशिवरात्री या दिवशी भाविकांनी स्नान केले. भाविकांनी नंदीची पूजा केली, तर काही भाविकांनी वाळूपासून ११ शिवलिंगे सिद्ध करून त्यांवर फळे, फुले, बेल वाहून त्यांची पूजा केली. स्नानांच्या अनुषंगाने मेळा प्रशासनाने सुरक्षाव्यवस्था केली होती. स्नान केल्यानंतर काही भाविकांनी गोदान करून विविध अनुष्ठानेही केली.
  • महाराष्ट्र आणि गुजरात येथून अधिक प्रमाणात भाविक आले होते. आदल्या दिवशी पडलेला पाऊस आणि त्यामुळे वाढलेली थंडी यांची पर्वा न करता केवळ श्रद्धेपोटी भाविक सकाळपासूनच येत होते. महाशिवरात्रीच्या दिवशी कुंभपर्वाचे शेवटचे स्नान असल्याने भाविकांची बरीच गर्दी झाली होती. विविध घाटांवर महिला पोलिसांसह कमांडोची फौजही नियुक्त करण्यात आली होती.

कुंभनगरीत भाविकांच्या धावपळीमुळे काही भाविक घायाळ !

कुंभनगरीत काही ठिकाणी भाविकांना त्रिवेणी संगमावर येण्यासाठी मोकळा रस्ता न मिळाल्याने त्यांची धावपळ झाली. सेक्टर १७ मधील ऐरावत प्रवेशद्वाराजवळ १ भाविक खाली पडला. गर्दीमुळे स्त्रिया, वयस्कर आणि लहान मुले सापडून चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे त्रिवेणी रस्त्यावरील बांधावर भाविकांच्या गर्दीमुळे रस्ता जाम झाला. संगमाकडे जाणारे आणि तेथून परत येणारे भाविक यांना रस्ता सापडला नाही. त्यामुळे काही भाविकांचा गट मंदिराच्या दिशेने गर्दीतून येत असतांना तेथेही प्रचंड गर्दी झाली. या वेळी भाविक इकडे-तिकडे धावू लागले. यामध्ये काही भाविक आणि लहान मुले किरकोळ घायाळ झाले. त्यानंतर प्रशासनाने काही ठिकाणी रस्त्यांवरील आणि पोलीस चौकासमोरील ‘बॅरिकेट्स’ तोडून रस्ता मोकळा करून दिला. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. दुपारी काही अतीमहनीय व्यक्ती आणि पोलीस यांची वाहने भाविकांच्या गर्दीत घुसल्यानेही भाविकांना त्रास झाला. त्या वेळी प्रशासनाने मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले होते. काही अधिकार्‍यांच्या मते राजयोगी स्नानाचे दिवस झाल्यानंतरही आखाडा आणि प्रशासकीय मार्गावरून भाविकांना जाण्यास अनुमती देण्यात आली नाही. यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणारे व्यवस्थापक हतबल झाले होते. (प्रशासनाच्या अशा भोंगळ कारभारामुळे भाविकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *