- श्रीलंकेतील अल्पसंख्यांक हिंदू आणि त्यांची मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना काही करतील, अशी अपेक्षा न करता सर्वत्रच्या हिंदूंनी आता संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही !
- श्रीलंकेत हिंदूंच्या धार्मिक वास्तू असुरक्षित !
या चित्रांद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसून केवळ विटंबना कशा प्रकारे केली जात आहे, ते समजावे यासाठी ही चित्रे प्रकाशित करत आहोत. – संपादक
मन्नार (श्रीलंका) : महाशिवरात्रीच्या कालावधीत श्रीलंकेतील अल्पसंख्यांक हिंदूंना प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले. ४ मार्च २०१९ या दिवशी मन्नार येथील तिरुकेतीश्वरम् मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेली स्वागताची कमान विरोधकांच्या एका गटाने बलपूर्वक तोडून टाकली, तसेच २८ फेब्रुवारी २०१९ या दिवशी काही हिंदुद्वेष्ट्यांनी त्रिंकोमली येथील तिरुकोनेश्वरम् मंदिराच्या आवारात ठेवण्यात आलेल्या शिवपिंडीचे भंजन केले. ‘या क्षेत्रात पोलीस आणि सैन्यदल यांचा २४ घंटे पहारा असतांनाही या घटना घडत आहेत’, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
- ‘तिरुकेतीश्वरम् मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या स्वागतकमानीचे प्रकरण मिटवण्यात आले असून न्यायालयाने स्वागतकमान परत बांधून देण्याचा आदेश दिला आहे’, असे श्रीलंकेचे राष्ट्रीय एकत्रीकरण, अधिकृत भाषा आणि हिंदु धार्मिक व्यवहार खात्याचे मंत्री मनो गणेशन् यांनी सांगितले.
- श्रीलंकेतील ख्रिस्ती मिशनर्यांकडून तेथील अल्पसंख्य हिंदूंवर होणार्या आक्रमणाचा निषेध करणे, तसेच मन्नार येथील तिरुकेतीश्वरम् मंदिर, त्रिंकोमली येथील तिरुकोनेश्वरम् मंदिर आणि हिंदूंच्या इतर धार्मिक वास्तूंवर होणार्या आक्रमणाचा निषेध करणे यांसाठी श्रीलंकेच्या मन्नार आणि यझपनाम जिल्ह्यांमध्ये ८ मार्च २०१९ या दिवशी भव्य निषेधमोर्चा झाला.
तिरुकेतीश्वरम् आणि तिरुकोनेश्वरम् मंदिरांचा प्राचीन इतिहास
रावणासुराच्या संहारानंतर लागलेले ब्रह्महत्येचे पातक दूर करण्यासाठी प्रभु श्रीरामाने श्रीलंकेतील पंचईश्वर असलेल्या ठिकाणी जाऊन पूजा केली होती. तिरुकेतीश्वरम् येथे रावणाची पत्नी मंदोदरीचे वडील ‘मयन महर्षि’ रहायचे. त्यांनी येथील शिवलिंगाची स्थापना केली आहे. पुढे महर्षि भृगु आणि त्यानंतर केतू ग्रहानेही या ठिकाणी पूजा केली. त्यामुळेच या स्थानाला ‘केतीश्वरम्’ असे नाव पडले.
तिरुकोनेश्वरम् मंदिराचा इतिहासही प्राचीन आहे. ‘कैलासात शिव आणि पार्वती यांच्या विवाहाच्या वेळी सर्व देवता उपस्थित असल्यामुळे पृथ्वीच्या उत्तरेकडील वजन वाढून ती एकीकडे कलते. यावर उपाय म्हणून भगवान शिव अगस्ति महर्षींना दक्षिणेकडे पाठवतात. त्या वेळी महर्षि अगस्तींनी तिरुकोनेश्वरम् येथे शिवानेच दिलेल्या शिवलिंगाची स्थापना केल्यावर पृथ्वी सरळ (स्थिर) झाली’, असे संदर्भ पुराणात आढळतात.
या दोन्ही ठिकाणी प्रभु श्रीरामाने स्वतः शिवपूजा केलेली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात