वेंगुर्ले : शहरातील पीराचा दर्गा येथील श्रीमती एलिजा कँजेटीन फर्नांडिस या त्यांच्या साथीदारांसह येथील हिंदु धर्मातील असाहाय्य आणि गरीब, तसेच भोळ्याभाबड्या लोकांना फूस लावून, काही आमिषे दाखवून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करत आहेत. याविषयी त्यांना विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. हिंदूंच्या धर्मांतराचा हा अनुचित प्रकार थांबणे सामाजिक शांततेसाठी आवश्यक आहे. हिंदूंच्या धर्मांतराचे प्रकार चालूच राहिल्यास भविष्यात सामाजात धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे एक उत्तरदायी नागरिक म्हणून प्रस्तुत घटना मी आपल्या निदर्शनास आणून देत आहे, तरी याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वेंगुर्ले भाजप तालुकाध्यक्ष प्रसन्ना बाळू देसाई यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. याविषयीचे निवेदन येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांना देण्यात आले.
धर्मांतराच्या विरोधात हिंदु बांधवांनो वेळीच सावध व्हा ! कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका !, असे आवाहन या वेळी करण्यात आले. या वेळी भाजपचे पदाधिकारी, विश्व हिंदु परिषदचे कार्यकर्ते, सनातन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी धर्मांतराविषयी सांगण्यात आलेली काही सूत्रे
१. विशिष्ट दिवशी भरपूर प्रमाणात मांसाहार तयार करून हिंदूंना जेवायला बोलावले जाते, तसेच मांसाहारासह अन्य वस्तूंचे आमीष दाखवले जाते.
२. धर्मांतर करणारे प्रॉटेस्टंट म्हणजे मिशनरी आहेत. हे भोळ्याभाबड्या गरिबांना धर्मातरित करण्याचा प्रयत्न करतात.
३. वर्षभर हे धर्मांतराचे कार्य चालू आहे. प्रत्येक रविवारी हे लोक ठराविक ठिकाणी जमतात. तेथे धर्मांतर केले जाते, अशी माहिती काही जणांकडून मिळाली आहे.
४. या प्रकरणात काही प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच काही शिक्षक यांची नावेसुद्धा चर्चेत आहेत. येत्या काही दिवसांत त्यांची नावेसुद्धा उघड करणार आहोत.
५. सर्वधर्मसमभाव आम्हाला मान्य आहे; पण धर्मांतर करण्याचे प्रकार आपल्या आजूबाजूला घडत असतील, तर लाईव्ह महाराष्ट्रला संपर्क करा. या प्रकारांना वाचा फोडण्याचे आम्ही काम करू.