Menu Close

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे हिंदु जनजागृती समितीचे आवाहन !

वादग्रस्त आणि हिंदुविरोधी विज्ञापन प्रसारीत केल्याबद्दल ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ कंपनीच्या संचालकांविरोधात गोवा आणि सोलापूर येथे पोलिसांत तक्रार दाखल

डावीकडून म्हापसा पोलीस ठाण्याचे निरीक्षक कपिल नायक, सौ. राजश्री गडेकर, सौ. शुभा सावंत, श्री. जयेश थळी, श्री. चंद्रकांत (भाई) पंडीत

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ कंपनीच्या ‘सर्फ एक्सेल’ या उत्पादनाचे रंगपंचमीनिमित्त एक विज्ञापन प्रसारित केले आहे. या विज्ञापनात हिंदूंच्या सणांच्या निमित्ताने पुन्हा एकदा हेतूतः हिंदूंचा अपमान केला आहे. यापूर्वीही या कंपनीच्या अनेक विज्ञापनांतून हिंदूंचा, हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अपमान केला गेला आहे. त्यामुळे या कंपनीच्या संचालकांवर भा.दं.सं. कलम २९५ अ आणि १५३ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, पुन्हा विज्ञापनांच्या माध्यमातून धार्मिक भेदभाव केला जाऊ नये, अशी कठोर कारवाई करावी आणि संबंधित विज्ञापनांवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी करत या कंपनीच्या कार्यकारी संचालकांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवा येथे श्री. चंद्रकांत (भाई) पंडीत यांनी म्हापसा पोलीस ठाण्यात, तर पंढरपूर (सोलापूर) येथे श्री. पुरुषोत्तम लंके यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. या वेळी गोवा येथे श्री. जयेश थळी, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री गडेकर, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत या उपस्थित होत्या. तसेच पंढरपूर येथे हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण डिंगरे, पेशवाई युवामंचचे अध्यक्ष श्री. ओंकार कुलकर्णी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे हे उपस्थित होते.

या विज्ञापनात ‘होळीच्या दिवशी लहान मुले रंग खेळत असतांना एक लहान हिंदु मुलगी सायकल चालवत येते आणि तेथील मुलांना तिच्यावर रंग फेकण्याचे आवाहन करते. त्यांचे रंग आणि पाण्याचे फुगे संपेपर्यंत तेथे ती फेर्‍या मारते. त्यांचे रंग आणि पाण्याचे फुगे संपल्यावर ती एका घरासमोर जाते, त्या एका घरातून पांढरा शुभ्र सदरा आणि पायजमा घातलेला लहान मुसलमान मुलगा बाहेर पडतो. ती मुलगी त्याला ‘बाहेर ये, सर्व (रंग) संपले आहे’, असे सांगत सायकलवर बसवून मशिदीच्या समोर नेऊन सोडते. तेव्हा तो मुलगा म्हणतो, ‘मी नमाज पढून येतो.’ त्या वेळी ती मुलगी म्हणजे ‘नंतर रंग पडेल.’ त्याच वेळी ‘आपलेपणाच्या रंगात इतरांना रंगवतांना डाग लागले, तर ते डाग चांगले आहेत’, असा संदेश दिला जातो. यातून कंपनीला नेमका काय संदेश द्यायचा आहे ? रंगपंचमीच्या दिवशी हिंदू समाज नमाज पठनाला जाणार्‍या मुसलमानांवर रंग उडवतात का ? हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा अशी पात्रे दाखवून काय साध्य करायचे आहे ? हिंदूंची रंगपंचमी आणि मुसलमानांचा नमाज यांचा काही संबंध आहे का ? प्रत्येक वेळी हिंदू सणांच्या वेळीच अशी विज्ञापने का येतात, असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतात. सोशल मिडीयाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात याचा विरोध होऊनही या कंपनीकडून याविषयी काहीही प्रतिसाद मिळालेला नाही, यातूनच या कंपनीला हिंदूंच्या धर्मभावनांची किती किंमत आहे, हेच दिसून येते.

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’चे हे पहिलेच वादग्रस्त विज्ञापन नसून यापूर्वी एका विज्ञापनात कुंभमेळ्यात आपल्या म्हातार्‍या आईवडीलांना मुले सोडून देण्यासाठी आणतात, अशा आशयाचे ‘रेड लेबल’ चहाचे वादग्रस्त विज्ञापन नुकतेच प्रसारित केले होते. त्याआधी गणेशचतुर्थीच्या काळात मुसलमान गणेशमूर्ती विक्रेता आणि मूर्ती घ्यायला आलेला हिंदु व्यक्ती यांचे वादग्रस्त विज्ञापन प्रसारित केले होते. एकूणच ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ने हिंदुविरोधी विज्ञापनांची मालिका चालवल्याचे दिसून येते. आता मात्र हिंदु हे सहन करणार नाहीत. या विरोधात ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत आंदोलन छेडले जाईल, असेही हिंदु जनजागृती समितीने कळवले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *