Menu Close

यावल : अवैध गोवंश वाहतूक प्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

पोलिसांच्या असमाधानकारक कारवाई विषयी असंतोष !

नायब तहसीलदार पवार (डावीकडे) यांना निवेदन देतांना

जळगाव : महाराष्ट्रात गोवंशहत्याबंदी कायदा लागू असतांनाही जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात अवैधरित्या चालू असलेल्या गोहत्या, गोवंशियांची तस्करी त्वरित बंद करण्याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन यावल तहसीलदार पवार यांच्याकरवी देण्यात आले.

तालुक्यात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे गोवंशाची हत्या सर्रासपणे केली जात आहे. गेल्या काही मासांत गोवंशियांची चोरी करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या सर्व घटनांमध्ये पोलिसांकडून आवश्यक साहाय्य मिळत नाही. ९ मार्च २०१९ या दिवशी एक गाडी गोवंशियांची अवैधरित्या वाहतूक करत असतांना काही जागृत युवकांनी थांबवली आणि त्यांच्याकडे गोवंशियांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची मागणी केली. ही कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याने त्यांना पोलीस ठाण्यात गाडी घेऊन जाण्यास त्या युवकांनी सांगितले. तेव्हा गाडीसमवेत असलेल्या युवकांनी त्यांच्या अन्य सहकार्‍यांना बोलावून गाडी थांबवणार्‍या युवकांशी हुज्जत घालणे चालू केले. त्यानंतर घटनास्थळी काही पोलीस पोहोचले आणि त्यांनी सर्वांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. पोलीस ठाण्यात जातांना मध्येच बाजाराच्या वर्दळीचा लाभ घेत गोवंशीय घेऊन जाणारी गाडी पसार झाली. त्यावर पोलिसांनी काहीच हरकत घेतली नाही. उलट गाडी थांबवणार्‍या एका युवकावरच दंगलीचा गुन्हा नोंद केला. या संदर्भातील वृत्तही अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली आहेत. पोलिसांचे हे कृत्य संशय निर्माण करणारे आहे. गोवंशियांच्या वाहतुकीची कोणतीही कागदपत्रे नसलेले वाहन विनापडताळणी कसे सोडून दिले ? यात पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का ? अथवा प्रशासनातील काही अधिकार्‍यांचे गोतस्करांशी साटेलोटे आहे का ? असे प्रश्‍न या निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आले आहेत.

या निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या याप्रमाणे 

  • यावल तालुक्यात चालणारी अवैध पशूवधगृहेे बंद करावीत, तसेच अवैधरित्या होणारी गोवंशियांची कत्तल थांबवावी. ही कत्तल करणार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी.
  • यावल तालुक्यातून होणारी गोवंशियांची तस्करी रोखावी, तसेच तस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.
  • ९ मार्चच्या घटनेत पसार झालेल्या गाडीचा मालक, तसेच संबंधित यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
  • वरील घटनेत कर्तव्यात चुकारपणा करणार्‍या पोलिसांवर कारवाई करावी.

पोलीस निरीक्षकाने घातली हुज्जत !

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन दिले जात असतांना तेथे यावलचे पोलीस निरीक्षक उपस्थित झाले. त्यांनी कार्यकर्त्यांशी ‘मी स्वतः त्या वाहनांची पडताळणी केली आहे. मी केलेली कारवाई योग्यच आहे’, असे म्हणत हुज्जत घातली. त्यावर कार्यकर्त्यांनी ‘‘गुन्हा नोंद केलेले दोन्ही तरुण एकमेकांना ओळखतसुद्धा नाहीत. तुमची कारवाई अन्यायकारक आहे. त्यांच्यावर कोणत्या कारणामुळे तुम्ही गुन्हे नोंद करत आहात ?’, असा प्रतिप्रश्‍न उपस्थित केला. पोलिसांनी गोवंशियांच्या अवैध वाहतुकीविषयी नोंद न करता ‘२ तरुणांमध्ये वाद झाला’, असे तक्रारीत नमूद केले होते.

तहसीलदारांनी संपर्क क्रमांक देण्याचे दिले आश्‍वासन !

हिंदुत्वनिष्ठांनी तहसीलदार श्री. जितेंद्र कुवर यांची भेट घेतली असता ते म्हणाले, ‘‘यापुढे अशी घटना घडल्यास तुम्ही कोणाशी संपर्क साधायचा याविषयी पोलिसांशी बोलून मी तुम्हाला एक संपर्क क्रमांक देतो.’’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *