पुणे : हिंदु समाज सहिष्णू असल्याने ‘जमात-ए-पुरोगामीं’कडून हिंदूंच्या श्रद्धांविषयी शंका निर्माण केली जाते. ‘रामजन्मभूमीच्या ठिकाणी मंदिराऐवजी एखादे रुग्णालय बांधू’ वगैरे म्हणणारे लोक ‘ज्यू, मुसलमान आणि ख्रिस्ती यांना श्रद्धेय असणार्या जेरुसलेमच्या वादाप्रकरणी तेथे रुग्णालय बांधण्याचा अन्य धर्मियांना समादेश (सल्ला) देत नाहीत. हिंदूंच्या श्रद्धा नष्ट करू पहाणारे पुरोगामी हे ‘विचारजंत’ आहेत, अशी टीका करत ज्येष्ठ व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी पुरो(अधो)गाम्यांच्या हिंदु धर्मविरोधी वृत्तीचा बुरखा फाडला. ‘परशुराम सेवा संघा’च्या वतीने डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि वैद्य परीक्षित शेवडेलिखित ‘राममंदिरच का ?’ आणि ‘जमात-ए-पुरोगामी’ या पुस्तकांच्या तिसर्या आवृत्तीचा प्रकाशन समारंभ १० मार्च या दिवशी येथील सिद्धार्थ सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी वैद्य परीक्षित शेवडे, राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे डॉ. रघुनाथ कुचिक, परशुराम सेवा संघाचे श्री. विश्वजीत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. होळीच्या निमित्ताने एक मुसलमान युवक हिंदु युवतीच्या गालाला रंग लावत असल्याचे, तसेच अन्य आक्षेपार्ह गोष्टी असलेले एक विज्ञापन प्रसिद्ध झाले आहे. ‘अशा आस्थापनांची उत्पादने वापरणारे मूढ आहेत’, असा उल्लेख करत डॉ. शेवडे यांनी या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले.
वैद्य परीक्षित शेवडे म्हणाले, ‘‘संस्कृत, हिंदी, ऊर्दू, फारसी या भाषांमधील साहित्यात रामजन्मभूमीचे संदर्भ सापडतात. अयोध्येतील रामजन्मभूमीस्थानी जेव्हा उत्खनन झाले, तेव्हा त्या ठिकाणी हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती, स्तंभ असे मंदिर असल्याचे सिद्ध करणारे अनेक पुरावे सापडले. तरीही या प्रकरणी न्याय मिळण्यास विलंब होत आहे. या प्रकरणी केवळ वेळकाढूपणा करण्यासाठी मुसलमान पक्षकारांकडून खोटेपणाने साक्षी दिल्या गेल्या. जो प्रश्न इतकी वर्षे सुटला नाही, तो मध्यस्थीने सुटेल का ?, हा प्रश्न आहे. मध्यस्थ नेमले, तरी ‘रामजन्मभूमीची तसूभरही भूमी इतरांना मिळणार नाही’, अशी ठाम भूमिका हिंदु पक्षकारांनी घ्यायला हवी.’’ श्री. विश्वजीत देशपांडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.
… तर शाहिस्तेखानाची तुटलेली बोटेही पुरावा म्हणून मागितली असती !
भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथील आतंकवादी तळ हवाई आक्रमण करून उद्ध्वस्त केल्यानंतर देशविरोधी मानसिकता असणार्यांनी त्याचे पुरावे मागितले होते. त्याचा उपहास करतांना डॉ. सच्चिदानंद शेवडे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी ‘जमात-ए-पुरोगामी’ नव्हते; म्हणून बरे झाले. अन्यथा त्यांनी त्या काळीही शाहिस्तेखानावर झालेल्या आक्रमणाचा पुरावा म्हणून शाहिस्तेखानाची तुटलेली बोटे मागितली असती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात