धामणे (जिल्हा बेळगाव) : भारतीय संस्कृतीत महिलांना मानाचे स्थान आहे; परंतु सध्या बलात्कार, कौटुंबिक छळ यांच्याच जोडीला मुली आणि विवाहित महिलासुद्धा ‘लव्ह जिहाद’सारख्या महाभयंकर षड्यंत्राला बळी पडत आहेत. हिंदु महिला धर्माचरणापासून दूर जात असल्यामुळे स्वैराचार, अमली पदार्थांचे सेवन अशा अनेक घटना घडत आहेत. एकीकडे देशाच्या संरक्षण क्षेत्रात महिला भरारी घेत आहेत, तर दुसरीकडे महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत. यासाठी प्रत्येक महिलेने स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन रणरागिणी शाखेच्या सौ. उज्ज्वला गावडे यांनी केले. ८ मार्च या दिवशी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने धामणे गावातील बसवन्ना गल्ली येथे हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने आयोजित शौर्यजागरण सभेत त्या बोलत होत्या.
या वेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. नंदा येळवी यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी स्वरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सभेचा लाभ १८० हून अधिक महिलांनी घेतला. या सभेत बलभीम युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भुजंग चव्हाण यांनी केले.