वेलिंग्टन : न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. हल्लेखोरांनी काळे कपडे परिधान केले होते. न्यूझीलंडच्या पोलिसांनी हल्लेखोर गोळीबार करत असलेल्या परिसराला चारही बाजूंनी घेरलं आहे. एका प्रत्यक्षदर्शीनं ४ ते ५ लोकांना गोळीबार करताना पाहिलं आहे.
न्यूझीलंड पोलिसांनी ४ जणांना ताब्यात असून, त्यात १ महिला तर ३ पुरुषांचा समावेश आहे. बांगलादेशची टीम सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. घटनास्थळी बांगलादेशच्या क्रिकेट संघाचे खेळाडूही उपस्थित होते. बांगलादेशातील क्रिकेट टीमचा खेळाडू तमीम इक्बालनं ट्विट करत याची माहिती दिली आहे.
गोळीबारात पूर्ण बांगलादेशची टीम थोडक्यात बचावली आहे. हा फारच भीतीदायक अनुभव असल्याचंही तमीम इक्बालनं सांगितलं आहे. खेळाडू बसमधून उतरून मशिदीत जाणार होते, त्याचदरम्यान हा गोळीबार झाला. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होते तेव्हा हा गोळीबार करण्यात आला, अशी माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते जलाल युनिस यांनी दिली.
सेंट्रल ख्राइस्टचर्चच्या प्रशासनानं लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, मशिदींमध्ये ज्यावेळी गोळीबार झाला, तेव्हा तिथे अनेक जण उपस्थित होते.
तर या मशिदींशेजारील परिसरही रिकामी करण्यात आला. न्यूझीलंडचे पंतप्रधान जॅसिंड आर्डन यांनी हा देशाच्या इतिहासातला काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. तसेच लोकांनी सुरक्षित जागी राहावे, असंही त्यांनी स्थानिक नागरिकांना आवाहन केलं आहे.
संदर्भ : लोकमत