गोसेवा प्रकोष्ठ मुस्लिम मंचचे राष्ट्रीय संयोजक मो. फैज खान यांची तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना चपराक देणारी विधाने !
म्हापसा : हिंदुस्थान युनिलिव्हरच्या सर्फ एक्सेल विज्ञापनात होळी न खेळणार्या कट्टरपंथी मुसलमानांना दाखवले आहे. या विज्ञापनाद्वारे अशा कट्टरपंथी मुसलमानांचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी टीका गोसेवा सद्भावना पदयात्रेच्या निमित्ताने गोवा भेटीवर आलेले गोसेवा प्रकोष्ठ मुस्लिम मंचचे राष्ट्रीय संयोजक मो. फैज खान यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केली.
प्रारंभी लेह, कन्याकुमारी ते अमृतसर अशी गोसेवा पदयात्रा करणारे मो. फैज खान हे म्हापसा येथे पोहोचल्यानंतर गोरक्षक आणि श्री बोडगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी त्यांचे स्वागत केले. देवस्थानचे पुजारी श्याम गावकर यांनी ही पदयात्रा सुखमय व्हावी, यासाठी देवाकडे गार्हाणे घातले. यानंतर मो. फैज खान पुढे म्हणाले, काही कट्टरपंथी मुसलमान होळी खेळत नाहीत. होळी खेळल्यास अल्ला नरकात पाठवेल, अशी भीती या मुसलमानांना वाटते. अशा कट्टरपंथी मुसलमानांनाच सर्फ एक्सेलच्या विज्ञापनात समाविष्ट केले आहे. या विज्ञापनात होळी खेळणार्या माझ्यासारख्या मुसलमानांना का घेतले नाही ? माझ्यासारखे अनेक मुसलमान आहेत जे टोपीही घालतात, भगवा कुडताही घालतात आणि होळीही खेळतात. अशा मुसलमानांना दाखवल्यास एकता वृद्धींगत होण्यास साहाय्य झाले असते; मात्र सर्फ एक्सेलच्या विज्ञापनाने होळीत रंग लावणे चुकीचे समजणार्या कट्टरपंथी मुसलमानांनाच प्रोत्साहन दिले आहे. अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्याचाच हा एक प्रयत्न आहे.
राजकारणी ख्रिस्ती समाजाला नाताळ गोशाळेत जाऊन साजरे करण्यास का सांगत नाही?
राजकीय पक्षांविषयी मो. फैज खान पुढे म्हणाले, कुठलाही राजकीय पक्ष तुष्टीकरणाशिवाय राजकारण करू शकत नाही. गोमांस खाण्यावर बंदी घातली, तर ख्रिस्ती आणि मुसलमान हे नाराज होतील, अशी भीती राजकारण्यांना वाटते. राजकारणी ख्रिस्ती समाजाला गोशाळेत जाऊन नाताळ साजरा करण्यास का सांगत नाहीत ? नाताळाच्या दिवशी मांस खाणे हे खूप मोठे पाप आहे. नाताळात ख्रिस्ती समाज गोठा सजवतात आणि त्यामध्ये सर्व प्राण्यांच्या प्रतिकृती ठेवतात आणि या प्राण्यांचेच मांस खाणे म्हणजे पाप आहे.
गोहत्या हे महापाप, बंदी हवीच !
गाय ही विश्वजननी आहे. तिचे महत्त्व वेदांनी वर्णिले आहे. कुराणात महंमद पैगंबरानेही गायीचे महत्त्व विषद केले आहे. येशू ख्रिस्त तर गायीच्या गोठ्यातच जन्माला आला. गुरांच्या मलमूत्रातून धरती समृद्ध होऊन चांगले पीक देते. यामुळे उत्तम प्रतीचे धनधान्य उत्पन्न होते; मात्र रासायनिक खतांमुळे आरोग्याला अपायकारक धान्य उत्पन्न होते आणि त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होत असतात. गोहत्या करून तिचे मांस खाणारे कर्करोगी बनत आहेत. गोहत्या हे महापाप आहे आणि त्यामुळे गोवंश हत्याबंदी ही व्हायलाच हवी. ज्या भूमीवर प्रभु श्रीरामचंद्रांचा जन्म झाला, त्या ठिकाणीच मंदिर उभारले जावे, अशी ५ लक्ष मुसलमानांची भावना आहे. या मुसलमानांनी याविषयी राष्ट्रपतींना एक पत्र लिहून कळवले आहे.
बलपूर्वक धर्मपरिवर्तन करणे चुकीचे
बलपूर्वक किंवा आमिषे दाखवून अन्य कुठल्याही मार्गाने धर्मपरिवर्तन करणे चुकीचे आहे. गोव्यासमवेतच तामिळनाडू आदी ठिकाणी ही समस्या मी पाहिली आहे. भारत हा सर्मसमावेशक असा देश आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात