भोपाळ येथे धर्मरक्षक संघटना आयोजित चौथे मध्य भारत हिंदू अधिवेशन
भोपाळ : सर्वधर्मसमभाव असे काही असूच शकत नाही. जो या देशाचा आहे, तो आमचा आहे. जो या देशाचा नाही त्याला येथे रहाण्याचा अधिकार नाही. आम्हाला धर्मानुसार वाटचाल करावी लागेल. सत्य बोलावे लागेल. देशाप्रती निष्ठा ठेवावी लागेल, असे प्रतिपादन भारत भक्ती आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी पूर्णचेतनानंद गिरिजी (पूर्वाश्रमीच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर) यांनी येथे केले. भोपाळमधील संत हिरदाराम नगर येथे ९ आणि १० मार्च या दिवशी धर्मरक्षक संघटनेने आयोजित केलेल्या चौथ्या मध्य भारत हिंदू अधिवेशनाच्या समारोप सत्राला संबोधित करतांना त्या बोलत होत्या. या अधिवेशनाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची उपस्थिती होती. तसेच अधिवेशनात मध्यप्रदेशातील भोपाळ, सिवनी, जबलपूर, इंदूर, विदिशा, सागर, बुरहानपूर इत्यादी जिल्ह्यांतील ७० कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राच्या प्रारंभी धर्मरक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. योगेश पटवाजी यांनी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट केला.
दोन दिवसीय या अधिवेशनात अखिल भारत हिंदु महासभेचे प्रदेशाध्यक्ष श्री. दिनेश सुगंधी (बुरहानपूर), प्रदेश महामंत्री श्री. जितेंद्र ठाकूर (इंदूर), हिंदू सेवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जेसवानी (जबलपूर), श्री. अभय पंडित, श्री. योगेश परमार, बजरंग दलाचे प्रांत सुरक्षा प्रमुख श्री. विशाल पुरोहित, श्री. जीतू कटारिया, श्री. करण सिंह, श्री. मारुती नंदन, श्री. विकास कसोले, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणिराजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, श्री. श्रीराम काणे, सनातन संस्थेचे श्री. गिरीश आगरकर, अधिवक्ता श्री. भरत तोमर इत्यादी वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
आता वृत्ती पालटण्याची वेळ आली आहे ! – कथावाचक डॉ. तरुण मुरारीबापू
अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राला संबोधित करतांना कथावाचक राष्ट्रसंत डॉ. तरुण मुरारीबापू म्हणाले की, भारत पूर्वी अखंड भारत होता. आमच्या दुर्बलतेमुळे त्याची हळू हळू शकले पडत गेली. आता आमची वृत्ती पालटण्याची वेळ आली आहे.
विश्वशांतीसाठी भारतात हिंदु राज्यप्रणाली स्थापन झाली पाहिजे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु आजपर्यंत हिंदूंना राज्यघटनेमध्ये अधिकृत अधिकार का नाहीत ? हिंदू बहुसंख्य असूनही गोहत्या, धर्मांतर प्रतिबंध यांविषयी कायदे का बनवले गेले नाहीत ? आम्ही स्वतंत्र झालो; परंतु आमची राज्यप्रणाली स्थापित केली गेली नाही. आज विश्वशांतीसाठी भारतात हिंदु राज्यप्रणाली स्थापन झाली पाहिजे. भारत हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी युवकांनी पुढे सरसावले पाहिजे.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करावेत ! – विनोद यादव, संस्थापक, धर्मरक्षक संघटना
आज धर्मांध ‘ताडका’ बनून, ख्रिस्ती मिशनरी ‘पूतना’ बनून आणि कम्युनिस्ट ‘शूर्पणखा’ बनून हिंदुत्वावर आक्रमण करत आहेत. देशाच्या घटनेमध्ये धर्मरक्षणाविषयी कुठलीच तरतूद नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांच्या माध्यमातून हिंदूंचे हित जपले जाऊ शकत नाही. सद्यस्थितीत सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
राष्ट्रहितासाठी दबावगट बनवणे आवश्यक ! – प्रा. रामेश्वर मिश्र
लांगूलचालन करणे राजकीय नेत्यांचा धर्म झाला आहे. भारतात भेदभावपूर्वक लांगूलचालन होत असून, हे चुकीचे आहे. आज राष्ट्रहितासाठी असा दबावगट निर्माण केला पाहिजे की, सरकार कुणाचेही असो, आपण राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचे कार्य त्यांच्याकडून करवून घेऊ.
भारतीय योद्धा समाज आहे ! – प्रा. कुसुमलता केडिया
भारत नरसिंहांचा देश आहे. आजही भारतात जेव्हा सैन्य भरती होते, तेव्हा चेंगराचेंगरी होते. यावरून भारतीय योद्धा समाज असल्याचे लक्षात येते. महाभारत किंवा रामायण या प्रेमकथा नाहीत, तर युद्धकथा आहेत. आज आपण हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी या पराक्रमी इतिहासाचे स्मरण करायला हवे.
युवकांनी हिंदु राष्ट्रासाठी पुढे यावे ! – श्री. भानूप्रताप, अध्यक्ष, जय माँ भवानी संघटना
‘लव्ह जिहाद’मध्ये फसणार्या भगिनींची सुटका कशी करायची, हे रामायणातील सुंदरकांडमध्ये शिकायला मिळते. आज व्यक्तीगत स्वार्थासाठी हिंदुत्वाचा उपयोग केला जात आहे. त्यासाठी युवकांनी हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी पुढे आले पाहिजे.