Menu Close

उत्तरप्रदेशमधील गोरखपूरमध्ये देवतांच्या १२ हून अधिक मूर्तींची तोडफोड

फोडलेल्या मूर्ती रस्त्यावर फेकल्या !

  • उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्याच शहरात अशा घटना घडत असतील, तर राज्यातील अन्य मंदिरे कशी सुरक्षित रहाणार ?
  • भाजपच्या राज्यात अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

हे छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक

गोरखपूर (उत्तरप्रदेश) : गोरखपूर शहरातील पादरी बाजारातील नटवीर बाबा मंदिरामधील देवतांच्या १२ हून अधिक मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करून त्या मूर्ती रस्त्यावर फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे लोक संतप्त झाले आहेत. त्यानंतर प्रशासनाने या मूर्ती पुन्हा जोडून त्या उभ्या केल्या आणि त्यावर कापड घालून त्या झाकल्या आहेत. (भंग झालेल्या मूर्ती या अशा प्रकारे झाकून न ठेवता त्यांचे विसर्जन करणे आवश्यक असते; मात्र धर्मशिक्षणाच्या अभावामुळे प्रशासनाला हे ठाऊक नसते. मूर्ती तोडफोडीच्या बर्‍याच घटनांनंतर प्रशासन आणि पोलीस अशा प्रकारे मूर्ती जोडून घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतात. याही घटनेनंतर प्रशासनाचा हाच डाव दिसून येत आहे ! – संपादक) तोडफोडीच्या घटनेनंतर उद्भवलेल्या तणावामुळे येथे मोठ्या संख्येने पोलीसदल तैनात करण्यात आले आहे.

पोलिसांची निष्क्रीयता !

‘पोलिसांचे गस्तीवाहन या मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावरच उभे असतांना त्यांना ही घटना घडतांना लक्षात का आले नाही?’, असा प्रश्‍न जनतेकडून विचारला जात आहे. (अशा निष्क्रीय पोलिसांवर सरकार काय कारवाई करणार आहे ? सर्वच ठिकाणचे पोलीस असेच करत असतील, तर उद्या आतंकवाद्यांनी आक्रमण केल्यावर काय स्थिती होईल, याची कल्पनाही न केलेली बरी ! – संपादक) येथे लावण्यात आलेले सीसीटीव्ही छायाचित्रकही नादुरस्त असल्याने घटना घडतांनाचे चित्रीकरणही उपलब्ध होऊ शकले नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार प्रथमदर्शी कोणीतरी खोड काढण्यासाठी असे कृत्य केल्याचे वाटत आहे. (खोड काढण्यासाठी हिंदूंच्या देवतांच्या मूर्तीलाच का लक्ष्य केले जाते ? पोलीस याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष तर करत नाहीत ना ? – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *