Menu Close

भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी संग्रहालय संस्कृती विकसित होणे आवश्यक ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

अलाहाबाद राष्ट्रीय संग्रहालयात ‘भारतीय संस्कृती आणि संग्रहालये’ या विषयावर व्याख्यान

प्रयागराज : प्रकृतीमधील म्हणजे मूळस्थितीमधील दोष दूर करणे म्हणजे संस्कृती विकसित करणे होय. भारतीय संस्कृती ही मानवी जीवन आणि प्रकृती यांच्यातील दोष दूर करून विकसित झालेली आहे. ही संंस्कृती प्रथम सिंधू, सरस्वती, गंगा आदी नद्यांच्या तटांवर विकसित झाली आणि नंतर पसरली. ऋग्वेद या सर्वांत प्राचीन ग्रंथामध्ये सिंधू-सरस्वती-गंगा-यमुना या नद्यांच्या तटावर विकसित झालेल्या जीवनाचे वर्णन आहे. ही विश्‍वातील सर्वांत प्राचीन संस्कृती होती, हे हडप्पा आणि मोहोंजोदडो येथील नागरी वस्तींचे उत्खनन झाल्यानंतर सिद्ध झाले. इंका, माया, मिस्र, मेसोपेटिया, ग्रीक इत्यादी प्राचीन समजल्या जाणार्‍या संस्कृती काळाच्या ओघात संपुष्टात आल्या; पण भारतीय संस्कृती लाखो वर्षे टिकली; कारण तिच्यात चैतन्य होते. या संस्कृतीने अनेक परकीय आक्रमणे सोसूनही स्वतःला जिवंत ठेवले. या लाखो वर्षांच्या काळातील जे सांस्कृतिक पुरावे वस्तूरूपात उपलब्ध झाले आहेत किंवा व्यक्ती, संस्था आणि शासन यांच्याद्वारे संग्रहित झाले आहेत, ते जगाला दाखवण्यासाठी संग्रहालये आवश्यक ठरतात. अशा वस्तूंचा संग्रह ही संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी भारतात संग्रहालय संस्कृती विकसित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी अलाहाबाद राष्ट्रीय संग्रहालयात ‘भारतीय संस्कृती आणि संग्रहालये’ या विषयावरील व्याख्यानात केले. या वेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अधिवक्ता श्री. प्रदीप गुप्त आणि संग्रहालयाचे निर्देशक डॉ. सुनील गुप्ता उपस्थित होते.

या वेळी श्री. राजहंस यांनी भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये, भारतियांची स्त्रीसन्मान संस्कृती, भारतीय युद्धसंस्कृती, भारतीय नीतीमूल्ये, भारतीय सामाजिक व्यवस्था आदींवर प्रकाश टाकला. ‘सनातन संस्थेचे संग्रहालय संस्कृतीच्या विकासातील योगदान’ या विषयावर बोलतांना श्री. राजहंस म्हणाले, ‘‘सनातन संस्था ही संग्रहालय संस्कृतीच्या विकासासाठी क्रियाशील आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक संग्रहालयाची निर्मिती केली जात आहे. या संग्रहालयासाठी भारतातील तीर्थक्षेत्रे, देवळे, संतांचे मठ, संतांची समाधीस्थाने, ऐतिहासिक स्थळे इत्यादी ठिकाणच्या अध्यात्मशास्त्रदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, माती, पाणी आदी, तसेच पंचमहाभूतांचा परिणाम दर्शवणार्‍या १५ सहस्र वस्तू, छायाचित्रे आणि २७ सहस्रांहून अधिक ध्वनीचित्रफिती यांचे आजपर्यंत जतन करण्यात आले आहे. भौतिक वस्तूंची संग्रहालये जगात सर्वत्र आहेत. हे सूक्ष्म-जगताची प्रचीती देणारे आणि विविध आध्यात्मिक वस्तूंचे जगातील एकमेव संग्रहालय आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मविश्‍वाच्या इतिहासात एक नवा अध्यायच लिहीत आहेत.’’

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रदीप गुप्त म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृतीचे सखोल चिंतन प्रथमच आम्ही एवढ्या वर्षांनी ऐकले. या चिंतनातून भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी का क्रियाशील झाले पाहिजे, हे लक्षात येते.’’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलाहाबाद राष्ट्रीय संग्रहालयाचे मुख्य निर्देशक श्री. सुनील गुप्ता यांनी केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *