हिंदूंना धर्मशिक्षण दिले असते, तर आज ही वेळ आली नसती !
होळी आणि धुळवड या वेळी होणारे अपप्रकार पहाता पोलिसांनी काढलेले आदेश योग्यच आहेत; मात्र अन्य धर्मियांच्या सण-उत्सवाच्या वेळी पोलिसांनी असे आदेश काढण्याचेही धारिष्ट्य दाखवावे, अशी रास्त अपेक्षा आहे ! हिंदूंच्या सणांमध्ये अन्य धर्मीय येऊन दंगली करतात, असाच आजपर्यंतचा इतिहास आहे, त्याविषयीही पोलिसांनी आदेश काढावेत !
मुंबई : एखाद्याच्या मनाविरुद्ध त्याच्यावर कोणी रंग किंवा फुगे फेकले, तर पोलीस संबंधितांना कह्यात घेणार आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह घोषणा देण्यात आणि गाणी गाण्यास बंदी घालण्यात आली आहे. ‘प्रतिष्ठा, संस्कृती, नैतिकता यांचे भान राखावे’, असेही पोलिसांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.
मुंबईमध्ये होळी आणि धुळवड (रंगपंचमी) हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. चाळ, इमारती, गृहनिर्माण वसाहती, तसेच रस्त्यावर, चौपाट्या, तसेच सार्वजनिक ठिकाणी धुळवड साजरी करण्यासाठी गर्दी होते. या उत्साहाला गालबोट लागू नये, जातीय हिंसा होऊ नये किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन केले आहे. ‘सार्वजनिक ठिकाणी कुणाच्या भावना दुखावतील अशा आक्षेपार्ह घोषणा देऊ नयेत, तसेच अशा प्रकारची गाणी गाऊ नयेत, पादचारी, तसेच इतर कोणावर संमतीविना रंग, पाण्याने किंवा रंगाने भरलेले फुगे टाकू नयेत.’
या संदर्भात तक्रार केल्यास किंवा पोलिसांच्या या आदेशाचे उल्लंघन करतांना कुणी आढळल्यास भादंवि कलम १८८ अंतर्गत संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. हा दखलपात्र आणि जामीनपात्र गुन्हा असून अटक झाल्यास १ मासाची शिक्षाही होऊ शकते. पोलिसांनी हे आदेश १९ ते २२ मार्च या कालावधीसाठी जारी केले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात