Menu Close

यंदाच्या वर्षीही हिंदु जनजागृती समितीचे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ १०० टक्के यशस्वी !

खडकवासला धरणाचे प्रदूषण रोखण्यासाठी मानवी साखळी !

खडकवासला धरणाभोवती मानवी साखळी करून उभे असलेले समितीचे कार्यकर्ते आणि अन्य

पुणे : धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंगाने माखलेले युवक-युवती पाण्यात उतरल्यामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती अन् अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने २१ मार्च या दिवशी खडकवासला जलाशय रक्षण अभियान राबवण्यात आले. या अभियानाच्या अंतर्गत समितीचे कार्यकर्ते मानवी साखळी करून खडकवासला जलाशयाच्या भोवती थांबले होते. कार्यकर्त्यांनी रंगपंचमी, होळी यांचे धर्मशास्त्र सांगणारे आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे प्रबोधनात्मक फलक हातात धरले होते. ‘कमिन्स इंडिया’ या आस्थापनाचे कर्मचारीही या अभियानाच्या अंतर्गत सहभागी झाले होते. गेल्या १६ वर्षांप्रमाणे या वर्षीही अभियान यशस्वी झाले. या अभियानाच्या अंतर्गत रंगाने माखलेल्या युवक-युवतींना पाण्यात उतरण्यास प्रतिबंध केल्याने अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. पोलीस-प्रशासनाचेही या अभियानाला चांगले सहकार्य लाभले. सण आणि उत्सव यांमध्ये शिरलेले अपप्रकार दूर व्हावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्यापक स्तरावर जनजागृतीपर अभियान राबवण्यात येते.

जलाशयात उतरण्यास आलेल्या लोकांचे  प्रबोधन करतांना समितीचे कार्यकर्ते

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दोन्ही दिवशी रंगाने माखलेले युवक-युवती अंघोळीसाठी, तसेच जलाशयात खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खडकवासला धरणाजवळ येतात. त्यांना धरणात उतरू दिल्यास मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते. या प्रदूषणामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून जलप्रदूषण रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, खडकवासला ग्रामस्थ, पाटबंधारे विभाग, ‘कमिन्स इंडिया लि.’ आणि अन्य समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणेच यंदाही राबवण्यात आलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ यशस्वी झाले.

धूलिवंदनाच्या दिवशी असलेल्या अभियानाचा प्रारंभ ह.भ.प. विद्यानंद सांगळे महाराजांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून आणि नारळ वाढवून झाला. या वेळी  खडकवासला येथील उपसरपंच सौ. स्मिता मते, तंटामुक्ती अभियानाचे माजी अध्यक्ष श्री. शांताराम मते, खडकवासला ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. आशाताई मते, पाटबंधारे विभागाचे श्री. धोंडिभाऊ भागवत, सामाजिक कार्यकर्ते श्री. शंकर रायकर, सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांसह अन्य धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

नारळ वाढवून अभियानाचे उद्घाटन करतांना ह.भ.प. विद्यानंद सांगळे महाराज

उद्घाटनाच्या प्रसंगी ह.भ.प. विद्यानंद सांगळे म्हणाले, ‘‘गेली १६ वर्षे सातत्याने होत असलेले हिंदु जनजागृती समितीचे हे धर्मरक्षणाचे आणि धर्मजागृतीचे कार्य स्तुत्य आहे. षड्विकारांचे निर्मूलन करून खरी रंगपंचमी ही नामजपाच्या रंगामध्ये खेळायची असते. सर्व संतांनीही पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.’’

तंटामुक्ती संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. शांताराम मते आणि उपसरपंच सौ. सीमा मते यांनीही समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी अभियानाचा उद्देश स्पष्ट केला, तर सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव यांनी होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी या उत्सवांचे धर्मशास्त्र सांगितले.

क्षणचित्रे

  • साहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील यांनी उपक्रमस्थळी भेट दिली. ‘पोलिसांनंतर तुम्हीच एवढे चांगले कार्य करत आहात. उत्स्फूर्तपणे हा उपक्रम राबवला जात असल्याने तो महत्त्वाचा आहे’, अशी प्रतिक्रिया दिली.
  • ज.एस्.पी.एम्. नर्र्‍हे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक गट अभियानात सहभागी झाला होता.
  • अनेकांनी समितीच्या उपक्रमाचे कौतुक करत या मोहिमेला समर्थन दिले.
  • सेवेच्या आरंभी जलदेवतेला सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
  • अनेकांनी हात उंचावून समितीच्या कार्यास आपला पाठिंबा दर्शवला.
  • या वेळी सनातनने ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादनांचा कक्षही लावला होता.

रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे २५ मार्चलाही अभियान

अशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजेच २५ मार्च या दिवशीही सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत अभियान राबवण्यात येणार आहे.

जलसंपदा विभागाच्या वतीने धरण परिसरात रिक्शातून उद्घोषणा करण्यात येत होती. ‘पाण्यात उतरण्यास प्रतिबंध असून त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल’, अशी सूचनाही या वेळी करण्यात आली.   

यंदाचे हे १७ वे वर्ष असून गेली १६ वर्षे राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण यांसाठीचा हा उपक्रम हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्याकडून यशस्वीपणे चालू आहे. समिती सातत्याने करत असलेल्या जनजागृतीमुळे आणि प्रबोधनात्मक मोहिमांमुळे घडणार्‍या अपप्रकारांत लक्षणीय घट झाली आहे. राज्यावर दुष्काळाचे सावट असतांना जलाशयात उतरून जलप्रदूषण करणे हे कृत्य अक्षम्य आहे. जलप्रदूषण रोखले जावे, उत्सवांमध्ये शिरलेले अपप्रकार थांबावेत, पोलीस आणि प्रशासन यांना सहकार्य व्हावे, या उद्देशाने राबवल्या जाणार्‍या या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *