मुंबई : निवडणुकांच्या राजकीय चिखलात हिंदु धर्माचा प्रचार करणार्या सनातन संस्थेला ओढण्याचा काहींचा हेतुपुरस्सर प्रयत्न चालू झाला आहे. सनातन संस्थेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसणारे भंडारी समाजाचे अध्यक्ष श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर यांना लक्ष्य करतांना सनातन संस्थेचा वापर करण्यात आला. श्री. बांदिवडेकर यांना काँग्रेस पक्षाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यावर काही वृत्तवाहिन्यांनी त्यांना ‘सनातनचे समर्थक’, तर काहींनी थेट ‘सनातन संस्थेचे कोकण विश्वस्त’ ठरवून टाकले. हे घोषित करतांना कोणताही पुरावा दिला गेला नाही किंवा सनातन संस्थेला बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही. या खोट्या बातम्यांमागील कर्ता-करविता कोण आहे, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. जिहादी आतंकवाद्यांना ‘ओसामाजी’, ‘हाफिज साहब’ आणि ‘मसूद अजहरजी’ संबोधणार्या काँग्रेस पक्षाशी हिंदुत्वाचे कार्य करणार्या सनातन संस्थेचा संबंध जोडणे, हा राजकीय दुष्प्रचार असून हिंदुत्वाचाच अपमान आहे. त्यामुळे याचा आम्ही कडाडून निषेध करत आहोत. राजकीय कुरघोड्यांसाठी सनातन संस्थेचा वापर करण्याचा हा प्रकार असून, या अपप्रचाराला हिंदु समाजाने बळी पडू नये, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी २२ मार्चला एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी सनातन संस्थेला विविध प्रकरणांत गोवून अपकीर्त (बदनाम) करणार्या आणि तिला संपवू पहाणार्या काँग्रेस पक्षाचे समर्थन सनातन संस्थेने करण्याची बातमीच हास्यास्पद आहे. देशाला गेल्या ७० वर्षांत रसातळाला नेणार्या काँग्रेस पक्षाचे समर्थन सनातन करू शकत नाही. सनातन संस्था राजकीय कार्य करत नाही, तर हिंदु धर्माच्या प्रसाराचे कार्य करते. त्यामुळे आम्ही केवळ भगवंताचे समर्थक आहोत आणि भगवंतच आमचा पाठीराखा आहे.
अधिवक्ता नवीन चोमल यांना सनातन संस्थेचे प्रवक्ते दाखवणार्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई !
सनातन संस्थेचा अपप्रचार करण्यासाठी संस्थेचे साधे सदस्यही नसणारे अधिवक्ता नवीन चोमल यांना एका वाहिनीवर सनातनच्या वतीने चर्चेत उपस्थित असल्याचे दाखवण्यात आले. या वाहिनीला यापूर्वीही अनेकदा लेखी कळवूनही ते सातत्याने श्री. चोमल यांना संस्थेचे प्रवक्ता, समर्थक, कायदेशीर सल्लागार असल्याचा खोटा प्रचार करतात. त्यामुळे याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याविषयी आम्ही अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहोत. सनातन संस्थेची अधिकृत भूमिका ही केवळ सनातनचे प्रवक्ते मांडतील, तीच ग्राह्य धरण्यात यावी, ही प्रसारमाध्यमांना विनंती आहे, असे श्री. राजहंस यांनी या प्रसिद्धीपत्रकातून नमूद केले आहे.