ख्रिस्ती पाद्य्रांकडून नन्सचे होणारे लैंगिक शोषण
भारतातील पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, महिला संघटना, तसेच भारतीय प्रसारमाध्यमे नन्सच्या या चळवळीकडे दुर्लक्ष करणार, हे लक्षात घ्या !
रोम (इटली) : गेल्या फेब्रुवारी मासात ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी प्रथमच रोमन कॅथलिक चर्चमधील पाद्य्रांंकडून नन्सवर होणार्या लैंगिक शोषणाची स्वीकृती दिली. अनेक वर्षे अशी प्रकरणे दाबून टाकण्यात ख्रिस्ती धर्माचे मुख्यालय असलेले व्हॅटिकन चर्च यशस्वी होत होते; मात्र गेल्या काही वर्षांपासून जगभरात चित्रपटसृष्टी आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांत काम करणार्या महिलांवर होणार्या लैंगिक शोषणाला ‘मी टू’ या ‘टिव्टर’वरील ‘हॅशटॅग’च्या माध्यमातून सामाजिक माध्यमांत वाचा फोडण्यात येत होती. त्याचाच आदर्श घेऊन आता ‘नन्स टू’ हा नवीन ‘हॅशटॅग’ सामाजिक माध्यमांत चालू झाला आहे आणि त्यावर जगातील अनेक पीडित नन्सनी त्यांच्यावर पाद्य्रांकडून झालेल्या लैंगिक शोषणाचे पुरावे सादर केले आहेत. या चळवळीला व्हॅटिकन येथून प्रकाशित होणार्या ख्रिस्ती धर्माच्या मुखपत्रातूनच प्रारंभ झाला आहे.
व्हॅटिकन येथून प्रकाशित होणार्या ख्रिस्ती धर्माच्या मुखपत्राच्या पुरवणीच्या संपादिका, इतिहासाच्या प्राध्यापिका आणि ‘माता’ आणि ‘स्त्री’ स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या ल्युसेटा स्काराफ्फा यांनी या पुरवणीत एक लेख लिहून जगभरातील पाद्य्रांकडून अल्पवयीन मुले आणि नन्स यांवर होणार्या लैंगिक शोषणाची शेकडो उदाहरणे दिली आहेत.
१. ल्युसेटा स्काराफ्फा यांनी त्यांच्या लेखात नन्सची मानसिक स्थिती मांडली आहे. ‘नन्सवर लैंगिक अत्याचार होणे फार कठीण आहे; कारण त्यांना नकाराधिकार वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे’, असा अपसमज सर्वसाधारणपणे आढळून येतो. तसेच ‘पाद्य्रांचे वशीकरण करून त्यांना अशी कृत्ये करण्यास नन्सच भाग पाडतात’, असे शिकवले जाते. त्यातच ज्या नन्स गर्भवती झाल्या त्यांना चर्चमधून काढून टाकण्यात येते. अशा गरीब नन्स त्यांच्या अनौरस अपत्यासमवेत दीनवाण्या परिस्थितीत जीवन जगतात. काही प्रकरणात त्यांचा गर्भपातही घडवून आणला जातो. त्याचा खर्च पाद्रीच करतात.
२. एका विश्वविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या सिस्टर कथेरिन औबिन म्हणतात, ‘‘व्हॅटिकनमध्ये पुरुषांचे वर्चस्व असते. काही थोडेच धर्माविषयी प्रामाणिक असतात. इतरांच्या डोक्यात अधिकाराची गुर्मी वाढते. त्यामुळेच नन्सवरील अत्याचाराची प्रकरणे घडतात. व्हॅटिकनमध्ये नन्स या असून नसल्यासारख्याच असतात. त्यांना कोणीही मान देत नाही.’’
३. नन्सवर होणार्या लैंगिक अत्याचारास प्रथम वर्ष १९८४ मध्ये सिस्टर मौरा डोनोह्यू यांनी वाचा फोडली. त्यांनी आफ्रिका, इटली, फिलिपिन्स आणि अमेरिका येथील नन्सवर झालेल्या अत्याचारांची माहिती गोळा करून व्हॅटिकनला अहवाल सादर केला. सिस्टर मौरा डोनोह्यू यांच्या मते आफ्रिकेत एड्स रोगाचे प्राबल्य असल्याने पाद्री सुरक्षित अशा नन्सचाच उपभोग घेत असत.
४. जेव्हा आफ्रिकेतील एका वरिष्ठ सिस्टरने तेथील २९ नन्स गर्भवती असल्याचा अहवाल दिला, तेव्हा तिलाच काढून टाकण्यात आले. एक नन तर गर्भपाताच्या वेळी मृत्यूमुखी पडली. तिच्या अंत्यसंस्कारासाठी तिच्यावर अत्याचार केलेल्या पाद्य्राचीच नेमणूक करण्यात आली.
५. भारतातील बिशप मुलक्कल याने एका ननवर केलेल्या अत्याचाराचे प्रकरण सर्वश्रुतच आहे. चिली देशातही असेच प्रकरण वृत्तवाहिनीवर गाजत आहे.
६. एका वृत्तसंस्थेने केलेल्या पाहणीनुसार युरोप, आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका येथील आरोपी पाद्य्रांवर व्हॅटिकनने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळेच ‘नन्स टू’ या चळवळीद्वारे अशा घटना उघडकीस येत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात