Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची यशस्वी सांगता

१७ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे धूलिवंदन आणि रंगपंचमी या उत्सवांच्या धर्मशास्त्राविषयी हिंदूंमध्ये जागृती

जलाशय रक्षण अभियान राबवतांना मान्यवर आणि कार्यकर्ते

पुणे : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्‍या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची २५ मार्च या दिवशी यशस्वी सांगता झाली. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही हे अभियान शतप्रतिशत यशस्वी झाले.

१७ वर्षांपासूनचे अथक प्रयत्न आणि प्रबोधन यांमुळे धूलिवंदन आणि रंगपंचमी या उत्सवांमधील अपप्रकारांमध्ये घट होऊन धर्मशास्त्राविषयी हिंदू जागृत झाल्याचे दिसून आले. समितीच्या कार्यकर्त्यांनी खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून रंगाने माखलेल्यांना पाण्यात उतरण्यास प्रतिबंध केल्याने जलाशयाचे संभाव्य प्रदूषण रोखले गेले. जलदेवतेचे अस्तित्व आणि कृपाशीर्वाद यांमुळेच हे शक्य झाले. या अभियानात खडकवासल्यातील ग्रामस्थ, ‘कमिन्स इंडिया’ या आस्थापनाचे ६० हून अधिक कर्मचारी, सनातन संस्था, तसेच रणरागिणी शाखा यांचे कार्यकर्ते यांचा सहभाग होता.

नागरिकांचे प्रबोधन करतांना समितीचा कार्यकर्ता (उजवीकडे)

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

१. भगवंत या कार्याला अधिकाधिक आशीर्वाद देवो, हीच प्रार्थना ! – विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान

हिंदु जनजागृती समितीने १७ वर्षांपूर्वीच खडकवासला जलाशय रक्षणाच्या कार्याचे बीज रुजवले होते. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. खडकवासल्यातील ग्रामस्थ श्री. विलास मते यांनीही हे अभियान गावामध्ये चालू केले. भगवंत त्यांच्या आणि हिंदु जनजागृती समितीच्या मागे उभा आहे; म्हणूनच हे कार्य शतप्रतिशत यशस्वी आहे. हिंदु जनजागृती समिती ही उत्स्फूर्तपणे समस्त हिंदूंसाठी कार्य करणारी संघटना आहे. त्यांना या कार्यासाठी अधिकाधिक आशीर्वाद द्यावे, हीच भगवंतचरणी प्रार्थना.

२. पर्यावरणरक्षण आणि धर्मशास्त्राविषयी जागृती करण्याचे कार्य अभिनंदनीय ! – विलास मते, सामाजिक कार्यकर्ते

जनतेमध्ये ज्याप्रमाणे रंगपंचमी साजरी करण्याचा उत्साह असतो, त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या रक्षणाचा विचार व्हायला हवा. हा विचार रुजवण्यासाठी, तसेच धर्मशास्त्राविषयी जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १७ वर्षे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवले जात आहे. आम्हीही या अभियानात सहभागी आहोत. समिती करत असलेल्या कार्याचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन आणि या कार्यासाठी आमच्या शुभेच्छा !

३. अभियानामुळे खडकवासला परिसरात पुष्कळ चैतन्य जाणवले ! – बाळासाहेब नवले, माजी नगरसेवक

एरव्ही खडकवासला धरणाजवळ पुष्कळ गडबड-गोंधळाचे वातावरण असल्याने येथे थांबावे असे वाटत नाही; परंतु आज या अभियानस्थळी आल्यावर मला ‘हा खडकवासल्याचाच परिसर आहे का ?’, असा प्रश्‍न पडला. या अभियानामुळे येथील परिसरात पुष्कळ चैतन्य जाणवत असून येथे बसून रहावे, असे वाटले.

४. पोलिसांचा कार्यभार समितीने उचलल्याने आम्हाला पुष्कळ सहकार्य मिळाले. – अशोक शेळके, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे

पोलीस-प्रशासनाचे सहकार्य

या अभियानासाठी पोलिसांचे चांगले सहकार्य लाभले. पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, पोलीस हवालदार सूर्यकांत राऊत, आर्.के. सोनवणे, विश्‍वास मोरे, होमगार्ड कांबळे, पाथरकर, महिला पोलीस हवालदार दिवार, मालुसरे यांनी खडकवासला येथे नाकाबंदी करत सहकार्य केले. पाटबंधारे विभागाच्या वतीनेही रंग खेळून पाण्यात उतरण्यास प्रतिबंध असल्याविषयीची जागृतीपर उद्घोषणा करण्यात येत होती. हिंदु जनजागृती समितीने याविषयी त्यांचे आभार व्यक्त केले.

क्षणचित्रे

  • पिंपरी येथील ‘डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग’च्या विद्यार्थिनींचे रंग लावून जलाशयात न उतरण्याविषयी प्रबोधन केल्यानंतर त्यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. त्या वेळी त्यांनी धूलिवंदन आणि रंगपंचमी यांचे धर्मशास्त्रीय महत्त्वही जाणून घेतले. त्यासह अभियानस्थळी लावण्यात आलेल्या प्रदर्शनकक्षाला भेट दिली आणि हिंदूंवर होणार्‍या आघातांविषयीही जाणून घेतले.
  • अनेक स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी अभियानस्थळी भेट देऊन समितीच्या कार्याचे कौतुक केले आणि शुभेच्छाही दिल्या.

धाराशिव जिल्ह्यातील एका गावाचे सरपंच श्री. चंद्रकांत घुले यांनी अभियानस्थळी भेट दिली. श्री घुले यांनी, ‘आमच्या भागात असे पाणी पहायला मिळणेही पुष्कळ अवघड आहे. तुम्ही जलाशयाचे रक्षण करून पुण्याचे काम करत आहात. तुमचे कार्य अभिनंदनीय आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *