वाई (जिल्हा सातारा) : हिंदूंमध्ये धर्मतेज जागृत करून नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि धर्माचे स्फुल्लिंग चेतवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० मार्च या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता येथील श्रीमहागणपति घाटावर जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे कार्यकर्ते श्री. हणमंत कदम यांनी दिली. येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. स्मिता भोज, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. संदीप जायगुडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील ही समितीची ३२ वी सभा पार पडत आहे.
सनातन संस्थेच्या सौ. रूपा महाडिक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री. काशिनाथ शेलार हे सभेतील वक्ते असणार आहेत. सभेसाठी वाई आणि पंचक्रोशीतील समस्त धर्मप्रेमी, शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंनी उपस्थित राहून हिंदु ऐक्याची शक्ती दाखवावी, असे आवाहन श्री. कदम यांनी केले.
पत्रकार परिषदेत सौ. स्मिता भोज यांनी सनातनच्या सहभागाविषयी पत्रकारांना अवगत केले, तर श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान समितीच्या कार्यात सक्रिय सहभागी असल्याचे श्री. संदीप जायगुडे यांनी घोषित केले. या वेळी श्री. हेमंत सोनवणे यांनी समितीच्या कार्याची ओळख करून दिली. पत्रकार परिषदेसाठी वाईतील ५ विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात