Menu Close

जगामध्ये ‘श्‍वेत राष्ट्रवादा’त मोठ्या प्रमाणात वाढ

युरोप आणि अमेरिका यांच्या सैन्यावरही परिणाम

हे ‘श्‍वेत राष्ट्रवादी’ विकसित देशांतील आणि आधुनिक देशांतील आहेत. ते विज्ञानवादी आहेत, तरीही त्यांच्यात स्थलांतरित मुसलमानांविषयी चीड निर्माण होत आहे. यामागील कारण भारतियांनी जाणून घेण्याची आवश्यकता आहे. असा प्रयत्न भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी, विज्ञानवादी, स्वतःला पुढारलेले समजणारे घेणार नाहीत, हेही तितेकच खरे !

ख्राइस्टचर्च (न्यूझीलंड) : येथील २ मशिदींवर झालेल्या गोळीबारानंतर श्‍वेतवर्णियांच्या राष्ट्रवादाचा विषय जोर धरू लागला आहे. ‘व्हाइट सुप्रिमसी’ म्हणजे ‘श्‍वेत सर्वोच्चता’ (श्‍वेतवर्णियांना श्रेष्ठ सांगणारा वंशभेदी विचार) पश्‍चिमेकडील जगात वाढू लागला आहे. मशिदींमध्ये गोळीबार करणार्‍या टॅरॅन्ट याने याच श्‍वेत सर्वोच्चतेविषयी म्हटले आहे. त्यातूनच त्याने गोळीबार करून ५० अश्‍वेत स्थलांतरित मुसलमानांना ठार केले. ही श्‍वेत सर्वोच्चता किंवा श्‍वेत राष्ट्रवाद वाढीस लागल्याची आकडेवारी समोर आली आहे.

१. ‘युनिव्हर्सिटी ऑफ मेरीगोल्ड’च्या ‘ग्लोबल टेररिझम डेटाबेस’नुसार वर्ष २०१२ ते २०१७ या कालावधीत श्‍वेत राष्ट्रवाद्यांची आक्रमणे वाढली आहेत. युरोपमध्ये मुसलमान प्रवाशांविषयी संताप व्यक्त होत आहे. त्यातून ही आक्रमणे होत आहेत.

२. वर्ष २०१६-१७ च्या कालावधीत युरोपमध्ये श्‍वेत राष्ट्रवाद्यांच्या आक्रमणात ४३ टक्के वाढ झाली आहे. याचा परिणाम ब्रिटनच्या ‘ब्रेक्झिट’शी संबंधित निर्णयावरही झाला. तसेच ‘युरोपियन युनियन’मधून बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान करणार्‍या ५४ टक्के मतदारांनी इस्लाम ब्रिटिशांसाठी धोकादायक असल्याचे सांगितले.

३. ‘श्‍वेत राष्ट्रवाद’ वाढण्यामागे इंटरनेट मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे’, असे सांगण्यात येत आहे. कट्टरतावाद्यांवर संशोधन करणारे जे.एम्. बर्गर यांनी त्यांच्या एका ट्वीटमध्ये वर्ष २०१६ च्या अभ्यासाचा उल्लेख करतांना लिहिले आहे की, वर्ष २०१२ नंतर अमेरिकी श्‍वेत राष्ट्रवादी आंदोलनांच्या पाठीराख्यांमध्ये ६०० टक्के वाढ झाली. आज ते प्रतिदिन ट्वीट करणे आणि ‘फॉलोअर्स’च्या संख्येत इस्लामिक स्टेटपेक्षाही पुढे आहेत.

४. ‘मिलिट्री टाइम्स’ने केलेल्या सर्वेक्षणात २२ टक्के सेवा सदस्यांनी सांगितले, ‘आम्हाला सैन्यदलात ‘श्‍वेत राष्ट्रवाद’ किंवा मग वंशवादी विचारांची लक्षणे दिसतात’, तर ३५ टक्के सदस्यांनी ‘श्‍वेत राष्ट्रवाद’ हा देशासाठी मोठा धोका आहे’, असे सांगितले.

५. ‘वॉशिंग्टन पोस्ट’नुसार वर्ष २०१७ मध्ये अमेरिकी अन्वेषण संस्थांनी सांगितले होते की, आम्ही श्‍वेत राष्ट्रवाद आणि स्थानिक आतंकवादी धमक्यांशी निगडित अनुमाने १ सहस्र प्रकरणांचे अन्वेषण करत आहोत. याच वेळी या संस्था इस्लामिक स्टेटने प्रेरित आतंकवादाच्या जवळपास इतक्याच प्रकरणांचे अन्वेषण करत होत्या.

६. न्यूझीलंडची लोकसंख्या ४८ लाख आहे. मशिदींमधील गोळीबारात ५० जण ठार होणे ही लोकसंख्येच्या प्रमाणानुसार विचार केल्यास अमेरिकेच्या ९/११ च्या आतंकवादी आक्रमणात झालेल्या हानीच्या तुलनेत अधिक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *