Menu Close

हिंदु विधीज्ञ परिषदेचा भ्रष्टाचारविरोधी लढा चालूच : आणखी एक भ्रष्टाचार उघड

  • वरसई (रायगड) येथे सरपंच आणि उपसरपंच यांनी प्रकल्पग्रस्त म्हणून लाभ मिळवण्यासाठी गावाशी संबंध नसलेल्या व्यक्तीची खोटी मिळकत दाखवली !

  • अलिबाग विशेष न्यायालयाकडून गुन्हा नोंदवण्याचा आदेश

मुंबई  वरसई (रायगड) : येथील सरपंच आणि उपसरपंच यांनी प्रकल्पग्रस्त म्हणून लाभ मिळवण्यासाठी गावाशी संबंध नसलेल्या व्यक्तीची खोटी मिळकत दाखवल्याचा प्रकार हिंदु विधीज्ञ परिषदेने उघड केला. यामुळे अलिबाग विशेष न्यायालयाने पोलिसांना वरसई ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. नीरा सुकीर वीर आणि उपसरपंच सौ. ज्योत्स्ना चंद्रकांत होजगे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला. हिंदु विधीज्ञ परिषदेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

याविषयी सविस्तर माहिती अशी की,

  • रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेले वरसई गाव हे कुप्रसिद्ध अशा ‘बाळगंगा प्रकल्पा’मुळे बाधित आहे.
  • या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावातील लोकांना म्हणजे प्रकल्पग्रस्तांना त्यांची शेतजमीन किंवा पडजमीन यांसाठी मोबदला मिळतो. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा घसारा काढून (म्हणजेच घराच्या बांधकामासाठी कोणते साहित्य वापरले गेले, घर बांधून किती काळ लोटला, या सर्वांवरून) त्याचे आजचे मूल्य ठरवून त्याप्रमाणे मोबदला दिला जातो.
  • हा मोबदला देतांना ग्रामपंचायतीच्या अभिलेखाचा आधार घेतला जातो. ग्रामपंचायतीच्या अभिलेखावरील घरे म्हणजेच गावातील एकूण मिळकतींची संख्या आणि त्यांचे वर्णन यांच्या आधारेच प्रकल्पग्रस्तांच्या मिळकतीचे मूल्यमापन करून त्यानुसार प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला जातो.
  • या गोष्टीचा लाभ उठवत वरसई ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. नीरा सुकीर वीर आणि उपसरपंच सौ. ज्योत्स्ना चंद्रकांत होजगे यांनी रामदास परशुराम बारटक्के या व्यक्तीच्या नावे वरसई गावात मिळकत असल्याचे दाखवलेे.
  • ग्रामपंचायतीच्या अभिलेखावर या नावाच्या व्यक्तीची मिळकत क्रमांक ४८४ असल्याचे दिसते; मात्र ही मिळकत म्हणजे घर आहे ? कि गोठा आहे ? कि अन्य काही आहे ?, याविषयी कुठलाही उल्लेख दिसून येत नाही.
  • प्रत्यक्षात गावामध्ये या नावाच्या कोणत्याही व्यक्तीचे घर, गोठा किंवा अन्य वास्तू दिसून येत नाही. याशिवाय ‘या नावाची व्यक्ती खरोखर अस्तित्वात आहे कि नाही ?’, ‘असल्यास तिचा गावाशी संबंध काय ?’, असे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात.
  • सदर मिळकत रामदास बारटक्के यांना वारसाहक्काने प्राप्त झाली आहे कि त्यांनी खरेदी केली आहे ? किंवा त्यांना बक्षीसपत्राने मिळाली आहे कि त्यांनी भाड्याने घेतली आहे ? यांविषयीच्या नोंदी, तसेच घर बांधणे आणि वीजजोडणी यांसाठी लागणारे ‘ना-हरकत पत्र’ इत्यादी कुठल्याही नोंदी ग्रामपंचायतीच्या अभिलेखात उपलब्ध नसल्याचे माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीवरून उघड झालेे.
  • याचाच अर्थ रामदास बारटक्के या व्यक्तीला आर्थिक रूपात मोबदला मिळावा, या हेतूने त्या इसमाची प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली मिळकत त्याच्या नावे दाखवण्याचा प्रकार सरपंच आणि उपसरपंच यांनी केला आहे, हे स्पष्ट होते.

‘बाळगंगा प्रकल्प भ्रष्टाचारविरोधी संघा’च्या सदस्यांच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेने न्यायालयात बाजू मांडली !

हा सर्व प्रकार भ्रष्टाचाराच्या व्याख्येत बसत असल्याने ‘बाळगंगा प्रकल्प भ्रष्टाचारविरोधी संघा’च्या सदस्यांनी संबंधितांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली; पण पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे भारतीय दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १५६ (३) अंतर्गत अलिबाग येथील विशेष सत्र न्यायालयाकडे दाद मागण्यात आली. त्यावर सुनावणी झाली. ‘बाळगंगा प्रकल्प भ्रष्टाचारविरोधी संघा’च्या सदस्यांच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वसंत बनसोडे यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. अधिवक्ता बनसोडे यांचा युक्तीवाद ऐकून अलिबाग येथील विशेष सत्र न्यायालयाने पोलिसांना वरसई ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. नीरा सुकीर वीर आणि उपसरपंच सौ. ज्योत्स्ना चंद्रकांत होजगे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून न्यायालयाला अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.

भ्रष्टाचारविरोधी लढा असाच चालू रहाणार ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ‘हिंदु विधीज्ञ परिषदेने आरंभलेला भ्रष्टाचारविरोधी लढा असाच चालू राहील’, असे स्पष्ट केले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *