शहाजानपूर (उत्तरप्रदेश) : प्रभु श्रीरामचंद्रांचे आक्षेपार्ह चित्र सामाजिक संकेतस्थळावरून प्रसारित झाल्याच्या निषेधार्थ उत्तरप्रदेशातील शहाजानपूर येथील एक मुसलमान युवक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेे. महंमद सलमान असे या युवकाचे नाव असून तो लोधीपूर येथील एका मोहल्ल्यातील रहिवासी आहे. (हिंदूंच्या देवतांच्या विडंबनाविषयी मुसलमान संवेदनशील आहे, अशी संवेदनशीलता हिंदूंमध्ये का नाही ? विडंबन रोखण्यासाठी आंदोलन करणार्या मुसलमानाकडून नतद्रष्ट हिंदू काही बोध घेतील, तो सुदिन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) काही दिवसांपासून एक व्यक्ती प्रभु श्रीरामचंद्रांचे चित्र जाळत असल्याचे छायाचित्र सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित होत आहे. ९ मार्च या दिवशी महंमदला भ्रमणभाषद्वारे ते प्राप्त झाले.
महंमदने निषेध करतांना म्हटले आहे की, सर्वांनी अन्य धर्मातील चित्रांचा अथवा धर्मध्वजांचा मान राखायला हवा. मानवता ही कोणत्या एका धर्माची नसून सर्व धर्मांची मुख्य धारणा आहे. दोषींवर कारवाई करण्याची महंमदने मागणी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात