धार्मिक कारणासह ‘मॅडकाऊ’ रोग होण्याच्या भीतीमुळेही विरोध
भारताने घेतलेला निर्णय योग्यच आहे; मात्र यापूर्वी अशा प्रकारचे दूध भारत घेत होता का?, हेही सरकारने जनतेला सांगायला हवे ! तसेच आता अशा प्रकारे भारतात कोणी त्यांच्या गायींना मांसाहारी चारा देत नाही ना ?, याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे !
नवी देहली : मांसाहारी अमेरिकी गायींचे दूध आणि त्यापासून बनवण्यात आलेले दुग्धजन्य पदार्थ घेण्यास भारताने नकार दिला आहे. गाय हा प्राणी भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक भावनांशी जोडला गेला आहे. त्यामुळे अमेरिकन दुग्धजन्य पदार्थांना भारताने विरोध केला आहे. गाय शाकाहारी प्राणी असतांना अमेरिकेमध्ये गायींच्या आहारात गाय, डुक्कर आणि मेंढी यांचे मांस मिसळले जाते. याला युरोपमधील देशांत ‘ब्लड मील’ असे म्हणतात.
जनावरांना मारून त्यांचे रक्त आणि मांस गोठवले जाते. या गोठवलेल्या मांसाला उन्हामध्ये किंवा हिटरमध्ये वाळवले जाते. त्यानंतर जो पदार्थ बनतो त्याला ‘ब्लड मील’ असे म्हणतात. ‘ब्लड मील’मध्ये मोठ्या प्रमाणावर ‘अमिनो’ आम्ल असते. हे आम्ल गायीच्या दुधातून मिळणार्या १० आवश्यक अमिनो आम्लापैकी एक आहे. दुभत्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दूध उत्पादन वाढावे, यासाठी त्यांना नियमित ‘ब्लड मील’ देण्यात येते.
भारताने नकार देण्यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत. वर्ष १९८० मध्ये ‘मॅडकाऊ’ नावाचा आजार अमेरिका आणि इंग्लंड येथे मोठ्या प्रमाणात पसरला होता. ‘ब्लड मील’मध्ये ‘प्रियॉन’ नावाचे प्रोटीन असते आणि याच प्रोटीनमुळे मॅडकाऊ नावाचा आजार दुभत्या जनावरांना होऊ शकतो, असे संशोधनामध्ये सिद्ध झाले.
या संशोधनानंतर अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागाने वर्ष १९९७ आणि २००८ मध्ये पशूपालन करतांना जनावरांच्या मांस आणि रक्त यांपासून बनवण्यात आलेल्या चार्याविषयी काही नियम केले. या नियमानुसार जनावरांच्या आहारातील ‘ब्लड मील’चे प्रमाण निश्चित करण्यात आले. हे प्रमाण आज निश्चित असले, तरी मॅडकाऊ हा आजार भारतातही येऊ शकतो. यामुळेच भारताने अमेरिकन दुग्धजन्य पदार्थांना विरोध केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात