समाजविघातक कृती करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करा !
सिंधुदुर्ग : दुधात भेसळ करून मानवी जीवनाशी खेळणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करण्याविषयी आणि लहान मुले अन् युवक यांना भ्रमणभाषमध्ये सहज उपलब्ध होणार्या पॉर्न साईट्स, अश्लीलता आणि हिंसक दृश्ये यांचा भडिमार असलेल्या वेब सिरीज यांवर त्वरित बंदी घालावी; सार्वजनिक ठिकाणी विनामूल्य इंटरनेट उपलब्ध केल्यामुळे होणारे दुष्परिणाम रोखावेत आदी मागण्यांविषयी हिंदु जनजागृती समितीने सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि कुडाळ, वेंगुर्ले, कणकवली, सावंतवाडी अन् देवगड येथील तहसीलदार यांना निवेदन दिले.
- सिंधुदुर्गनगरी (ओरोस) : येथे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती रोहिणी रजपूत यांना निवेदन देण्यात आले. या वेळी कसाल-ओरोस विभाग शिवसेना संघटक डॉ. सुर्यकांत बालम, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री जगन्नाथ केरकर, सुरेश दाभोलकर, रवींद्र परब आणि सनातनचे गजानन मुंज उपस्थित होते.
- सावंतवाडी : येथील निवासी नायब तहसीलदार प्रदीप पवार यांना निवृत्त प्राध्यापक सुभाष गोवेकर, निवृत्त शिक्षक श्री. अंकुश गवस, धर्माभिमानी श्री. देविदास वेंगुर्लेकर, सनातनचे श्री. शंकर निकम, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री चंद्रकांत बिले आणि राघोबा निब्रे यांनी निवेदन दिले.
याचप्रमाणे देवगड येथे तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार सौ. प्रिया परब, कणकवलीचे तहसीलदार संजय पावसकर, कुडाळ येथे तहसीलदार मच्छिंद्र काळू सुकटे आणि मालवण येथे नायब तहसीलदार साईनाथ गोसावी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्र अन् धर्म प्रेमी नागरिक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक उपस्थित होते.
निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या
१. पॉर्न साइट्स, अश्लील आणि ऑनलाइन वेश्याव्यवसाय करणारी संकेतस्थळे यांवर बंदी घाला !
देशात महिला आणि अल्पवयीन मुले यांवरील लैंगिक अत्याचार अन् बलात्कार यांत प्रचंड वाढ झाली आहे. यामागील एक महत्त्वाचे कारण पॉर्न साइट्स, अश्लील आणि ऑनलाइन वेश्याव्यवसाय करणारी संकेतस्थळे पहाणे, हेही आहे. सध्या वेब सीरीजचादेखील सुळसुळाट झाला असून याद्वारेही अश्लीलता, अनैतिकता आणि गुन्हेगारी यांची परिसीमा गाठणारे चित्रण कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रसारित होत आहे. त्यामुळे अशा समाजघातकी पॉर्न साइट्स, अश्लील आणि ऑनलाइन वेश्याव्यवसाय करणारी संकेतस्थळे यांवर बंदी घालावी.
२. दुधात भेसळ करून मानवी आरोग्याशी खेळणार्यांवर कठोर कारवाई करा !
महाराष्ट्रात २ लाख लिटर पाण्याची भेसळ करून दुधाची विक्री केली जात आहे. दुधात सध्या भेसळ करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या भेसळीसाठी दुधात वनस्पती तूप, स्टार्च, युरिया, साखर, ग्लुकोज, माल्टोडेक्स्ट्रीन, दूध पावडर, ग्लिसरीन, सेल्युलोज, खाद्य तेल, डिटर्जंट पावडर आदी पदार्थ वापरण्यात येतात. दुधात अशा प्रकारची भेसळ करणार्यांवर कठोर कारवाई करावी.
३. पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करा !
देशात बहुतांश ठिकाणी पेट्रोल-डिझेल पंपांवर ग्राहकांना फसवणे, भेसळयुक्त इंधन पुरवणे आदी गोष्टी सर्रास होत आहेत. हे होऊ नये, यासाठी ज्या पाईपमधून पेट्रोल किंवा डिझेल वाहनामध्ये भरले जाते, तो पाईप पारदर्शक करावा. जेणेकरून त्यातून नक्की पेट्रोल जाते आहे कि नाही, हे ग्राहकांना समजू शकेल. ग्राहकांची फसवणूक आणि इंधनांमध्ये भेसळ करणार्या पेट्रोलपंप चालकांची अनुमती रहित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.